पंतप्रधान मोदी-अमित शहांना घाबरणार नाही

अभिजित दीपकेंची नागपुरात गर्जना

हुकूमशाहीचा अंत केल्याशिवाय गप्प बसणार नाही

नागपूर /11ऑक्टोबर  : केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे नेते काँक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांनी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला. दिल्लीतील आंदोलनातून ते आजीच्या निधनानंतर हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिपरी या गावी जात असताना नागपूर विमानतळावर उतरले होते. त्यांनी दिल्ली पोलिस गुंड असल्याचेही नमुद केले.
नागपूर विमानतळावर अभिजित दीपके प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना गुंड करून ठेवले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या हुकूमशाहीला घाबरणार नाही. आंदोलन सुरूच राहणार असून जेवढ्या वेळा कारागृहात टाकायचे टाकावे. त्यांच्या हुकूमशाहीचा अंत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दीपके यांनी दिला. दिल्ली पोलिस कारवाईच्या नावावर मुलींवर हात टाकत आहे. असेच सुरू राहीले तर एक दिवस ते पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्या इशार्‍यावरून विद्यार्थ्यांचा खूनही करतील. त्यामुळे हुकूमशाही संपवावी लागेल.ज्या पोलिसांवर आम्ही आरोपकेले. त्यांना केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी पदोन्नती दिली. जेव्हा देश गुंडे चालवतात, तेव्हा गुंड्यांची पदोन्नती केले जाते, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मला ताब्यात घेतले होते. माझ्या आजीचे निधन झाल्यामुळे चुलत भावासोबत बोलण्याकरिता पोलिसांकडे असलेला माझा भ्रमणध्वनी मागितला. परंतु त्यांनी क्रमांक सांगा आम्ही लावतो म्हणाले. मी त्यांना माझा भ्रमणध्वनी द्या, त्यातून नंबर शोधून तुम्हाला देतो, असे म्हटले. त्यानंतरही त्यांनी मला भ्रमणध्वनी दिला नाही. कायद्यानुसार मला माझ्या वकिलाशी बोलण्याचा अधिकार आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी मला वकिलांसोबत बोलण्यासाठीही भ्रमणध्वनी दिला नाही. नातेवाईकांशीही संपर्क करू दिला नाही, असा आरोप दीपके यांनी केला.
रात्री साडेतीन वाजता दिल्ली पोलिसांनी मला उठवून आई-वडिलांना अटक झाल्याची माहिती देण्याबाबत दबाव टाकला. यामागे कुठले षडयंत्र आहे, असा सवाल दीपकेंनी केला. दिवसभर पोलिसांनी संपर्क करू दिला नाही. त्यांनी सकाळपर्यंतही प्रतीक्षा केली नाही. पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता कायदेशीर प्रक्रिया असल्याचे सांगितले. माझ्या आजीच्या निधनाच्या धक्क्यात माझे आई-वडील होते. त्यांना अटकेचा दुसरा धक्का द्यावा, असे दिल्ली पोलिसांतील गुंडांची इच्छा होती. दिल्ली पोलिसांत माणुसकी शिल्लक नसून ते गुंडगिरीवर आले आहेत. ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी हुकूमशाही संपवावी लागेल, असेही दीपके म्हणाले.

Back to top button