प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम
एका आस्थापनावर 5 हजारांचा दंड

अमरावती /16 मार्च : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता व प्लास्टिक बंदी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून दिनांक 16 मार्च 2026 रोजी झोन क्र.1 रामपुरी कॅम्प अंतर्गत येणार्या गाडगेनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेदरम्यान एकूण 9 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये कापडी व कागदी पिशव्या तसेच 51 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात असल्याचे आढळून आले. मात्र एका आस्थापनात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने संबंधित आस्थापना चालक सचिन पालेकर यांच्याकडून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी विनोद टांक, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डीक्याव, प्लास्टिक स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी तसेच स्वास्थ निरीक्षक निखिल खंगाळे, प्रवीण उसरे आणि रोहित हडाले उपस्थित होते.




