विधी विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांत संधी-अ‍ॅड.गजानन पुंडकर

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ थाटात

अमरावती /19 मार्च – बदलत्या जागतिक प्रवाहात विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे ही काळाची गरज असून, विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी नेहमी ज्ञानसंपन्न आणि अद्ययावत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात आयोजित पदवी वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी विधी क्षेत्रात करिअरच्या अनेक नव्या वाटा खुल्या असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे असे आवाहन केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देशानुसार आयोजित या सोहळ्यात 2024-25 सत्रातील उत्तीर्ण स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पदव्या प्रदान करून गौरविण्यात आले.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्ती अर्जुन आणि विशेष अतिथी म्हणून लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांची उपस्थिती होती. प्रारंभी महाविद्यालयाच्या वतीने कमलताई गवई यांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी महापुरुषांच्या विचारांची शिदोरी जपण्याचे आवाहन केले, तसेच उत्तम आरोग्यासाठी विपश्यना साधनेचे महत्त्व विशद केले. केशवराव मेतकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी उभारलेल्या या शिक्षण संस्थेची दूरदृष्टी मांडली. कीर्ती अर्जुन यांनी आपल्या भाषणात कायद्याचे सामाजिक महत्त्व पटवून देत, या ज्ञानाचा उपयोग जनसामान्यांच्या कल्याणासाठी करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी केले. यावेळी विविध सत्रांतील गुणवंतांची नावे डॉ. एन. के. रामटेके, डॉ. राजेश पाटील, प्रा. संदीप वानखडे आणि डॉ. प्रणय मालवीय यांनी जाहीर केली. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. प्राची कडू यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सपना विधळे यांनी करून दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button