आ.रवी राणांचा भातकुलीत कामाचा ‘धडाका’
कोट्यवधींच्या निधीतून कामाला वेग

* चुकार अधिकारी व कंत्राटदार धारेवर
भातकुली /16एप्रिल– तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार रवी राणा यांनी गुरुवारी प्रशासकीय यंत्रणेची कडक झाडाझडती घेतली. केवळ कागदोपत्री घोडे न नाचवता प्रत्यक्ष जमिनीवर कामे करून दाखवा, असा सज्जड दम भरत त्यांनी दिरंगाई करणार्या कार्यकारी अभियंत्यांसह कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पदरात पाडून घेतला असून, ही सर्व कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने मार्गी लावण्याच्या कडक सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत आमदार राणा यांनी विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये नमो उद्यानासाठी 1 कोटी, सुसज्ज क्रीडा संकुलासाठी 3 कोटी आणि नाला सरळीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे कामही सुरू झाले असून 150 गरजूंना हक्काचे दाखले देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, 15 गावांतील शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या पांदण रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले. बैठकीनंतर त्यांनी भातकुली, कानफोडी ते गणोजा देवी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. कामात त्रुटी आढळल्यास कंत्राटदाराची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नवीन तहसील इमारतीसह परिसरातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी यंत्रणेला बजावले.
यावेळी नगराध्यक्षा योगिता कोल्हटकर, उपनगराध्यक्ष कांडळकर, नगरसेवक शंकर डोंगरे, सुनील भोंसले, पुरुषोत्तम खचाने, राजू ठोंबरे, तहसीलदार मांडवे, मुख्याधिकारी भाग्यश्री बोरेकर, ठाणेदार रवींद्र राजूरकर, कार्यकारी अभियंता अडसूळे, सुनील राणा, गजानन पाटील, उमेश ढोणे, अनिल तिडके, प्रकाश खर्जन, सागर झास्तकर, सागर कळसकर, ज्ञानेश्वर झासकर, राजू चुुंकीकर, सादिक भाई, मिलिंद अवगड, आरिफ भाई यांसह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




