आरोग्य विभागाची गरुडझेप : 28 बालकांना थॅलेसिमियामुक्त नवजीवन
जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त ‘एचएलए’ तपासणी शिबिर संपन्न

अमरावती/12 मे: एका आईच्या डोळ्यांतील आनंदाश्रू, वडिलांच्या चेहर्यावर उमललेले हास्य आणि रक्ताच्या बाटल्यांपासून मुक्त झालेलं बालपण… हे सुखद चित्र आज अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामुळे साकार झाले आहे. ’जागतिक थॅलेसिमिया दिनाचे’ औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात अमरावती आरोग्य विभागाने थॅलेसिमियामुक्तीच्या दिशेने एक आशादायी पाऊल टाकले असून, आतापर्यंत 28 बालकांना यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे नवे आयुष्य मिळाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डे केअर युनिट आणि संकल्प इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त मोफत एचएलए (कङ-) तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या तपासणीमुळे अनेक बालकांना भविष्यात थॅलेसिमियामुक्त जीवन जगण्याची नवी आशा मिळाली आहे. या शिबिरात 20 बालकांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, ज्या रुग्णांना अधिक गुंतागुंतीच्या चाचण्यांची गरज आहे, त्यांचे नमुने जर्मनी येथे पाठवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याला मिळालेली नवसंजीवनी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्प इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने थॅलेसिमियाशी झुंज देणार्या कुटुंबांना नवआयुष्याची उमेद मिळाली आहे. दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. ‘थॅलेसीमिया’ हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, जो आई वडीलांपासून मुलांना येतो. या आजाराचे लक्षण जवळपास 3 महिन्या नंतर कळून येतात. या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते. जेणेकरून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डे केअर युनिटमार्फत सीएमसी वेल्लोर, बंगळुरू, अहमदाबाद, डठउउ मुंबई व इतर नामांकित रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 28 बालकांचे यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले असून ही सर्व बालके आज निरोगी आणि थॅलेसिमियामुक्त आयुष्य जगत आहेत. या कृतीमुळे बालकांच्या पालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि संकल्प इंडिया फाउंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली. थॅलेसिमियाविरुद्धची ही लढाई आता केवळ उपचारापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती अनेक निष्पाप बालकांना नवजीवन देणारी आशेची चळवळ बनली आहे.
आरोग्य विभागाची प्रभावी कामगिरी
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पनेनुसार आम्ही जिल्ह्यात थॅलेसिमियामुक्तीसाठी कटिबद्ध आहोत. थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, ती त्यांच्या आयुष्याला मिळालेली नवसंजीवनी आहे.
– डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्यचिकित्सक




