शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफी करा

शेतकरी संघटनेची महसूल मंत्र्यांकडे मागणी

* पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप

अमरावती / 28 मार्च – राज्यातील हजारो शेतकरी अद्यापही कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असल्याने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी मंडळाने महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.
महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने पैसे जमा करावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक शेतकरी आजही ’थकीतदार’ म्हणूनच गणले जात आहेत, ही वस्तुस्थिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, केवळ 2022-23 ते 2024-25 या काळातील नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांनाच लाभ देणे अन्यायकारक आहे. मागील काही वर्षांत अस्मानी संकटांमुळे ज्यांचे नुकसान झाले, अशा सर्व शेतकर्‍यांचा या योजनेत समावेश होणे गरजेचे आहे. सरकारी आश्वासनांची पूर्तता वेळेत होत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा सरकारवरील विश्वास उडू लागला आहे. त्यामुळे आता केवळ पोकळ घोषणा नको तर ठोस निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या पदरात मदत टाकावी, अशी आर्त हाक या प्रतिनिधी मंडळाने दिली आहे. महसूल मंत्र्यांनी यावर सकारात्मक चर्चा केली असली तरी, आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
प्रशासकीय अडथळ्यांचा शेतकर्‍यांना फटका-उच्च न्यायालयाने पात्र ठरवूनही तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली आहे. बँकांच्या दप्तरी अजूनही शेतकरी थकबाकीदार असल्याने त्यांना नवीन पीक कर्ज मिळणे कठीण झाले आहे. सरकारने संवेदनशील होऊन यावर तातडीने तोडगा काढावा, तरच खर्‍या अर्थाने बळीराजाला दिलासा मिळेल.

संबंधित बातम्या

Back to top button