अमरावती तहसीलमध्ये शासकीय योजनांचा महामेळावा
403 कोटींचे शासकीय मेडिकल कॉलेज वडद येथेच

* आ.रवी राणांचे स्पष्टीकरण
अमरावती/15 मे -छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सरकारी योजना थेट गावशिवारातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य जिल्हा प्रशासनाने केले आहे, अशा शब्दांत आमदार रवी राणा यांनी प्रशासकीय यंत्रणेचे भरभरून कौतुक केले. अमरावती तहसीलदार कार्यालयात आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जनतेची प्रतीक्षा संपवत, 403 कोटी रुपयांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वडद (अलिराबाद) क्षेत्रातच उभारले जाणार असून त्याची जागा कोणत्याही परिस्थितीत बदलणार नसल्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पाठपुराव्यामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या सोहळ्यात लोककल्याणाच्या विविध कामांचा आढावा घेताना आमदार राणा म्हणाले की, महसूल विभागाच्या तत्परतेमुळे जिल्ह्यातील 68 गावे आज पूर्णपणे तंटामुक्त झाली आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा वाहत असताना शेतपांदण रस्त्यांचे मोठे जाळे विणले जात आहे. ’उमेद’ अभियानांतर्गत 16 महिला बचत गटांना 1 कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांना आर्थिक बळ देण्यात आले. तसेच हक्काच्या घरासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रक आणि शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. स्पर्धा परीक्षेत बाजी मारून सरकारी सेवेत रुजू झालेल्या स्थानिक गुणवंतांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे, मुद्रांक उपजिल्हाधिकारी अनिल औतकर यांच्यासह महसूलचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




