अंजनगाव सुर्जीतील सरकारी कार्यालयांत ‘करेक्ट कार्यक्रम’

शासकीय फाईल अडवणूक अन् शिवराळ भाषेचा कहर उद्धट बाबूंना वरिष्ठ घालतील का लगाम ?

अंजनगाव सुर्जी /25 फेब्रुवारी : पांढरपेशी वेशातील सरकारी खुर्च्यांवर बसून सर्वसामान्यांच्या पाचवीला पूजलेला छळ आणि उद्धटपणाचा कळस आता अंजनगाव सुर्जी शहरात उघड झाला आहे. जनतेच्या घामाच्या पैशातून गलेलठ्ठ पगार घेणार्‍या काही मुजोर कर्मचार्‍यांनी अक्षरशः ’राजेशाही’ थाट मांडला असून, कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. दाखले, नोंदणी आणि हक्काच्या प्रमाणपत्रांसाठी हेलपाटे मारणार्‍या अबालवृद्धांना ’उद्या या’ची गाजरे दाखवून त्यांचा मानसिक छळ करणार्‍या या टोळीचा सुळसुळाट वाढला आहे. प्रशासकीय सेवेचा बुरखा पांघरून नियमांची थट्टा उडवणार्‍या या मुजोर वृत्तीचा आता ’करेक्ट कार्यक्रम’ करण्याची वेळ आली असून, शहरात संतापाचा ज्वालामुखी धगधगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही महत्त्वाच्या विभागांत नागरिकांची अडवणूक करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. फाईल मिळत नाही, साहेब बैठकीत आहेत, तुमचे काम होणार नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन सर्वसामान्यांना वार्‍यावर सोडले जात आहे. विशेषतः हतबल महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तासनतास ताटकळत ठेवून त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलण्याचे प्रकार घडत आहेत. हा केवळ कामातील उशीर नसून, लोकशाहीचा गळा घोटणारा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. काही प्रामाणिक कर्मचार्‍यांच्या निष्ठेला या ’कामचोर’ मंडळींमुळे काळिमा फासला जात असून, प्रशासनाने या अनागोंदीची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा जनताच रस्त्यावर उतरून आपला हिशोब चुकता करेल, असा इशारा आता देण्यात आला आहे.
खिशाला कात्री अन् मनाला जखम-सरकारी कार्यालये ही सेवेचे मंदिर की छळवणुकीचा अड्डा? असा जळजळीत सवाल आता उपस्थित होत आहे. अंजनगाव सुर्जीतील या मुजोर कारभाराची सखोल चौकशी करून दोषींना घरचा रस्ता दाखवावा, तरच या माजलेल्या कर्मचार्‍यांचे पाय जमिनीवर येतील आणि सुशासनाची पहाट होईल.

संबंधित बातम्या

Back to top button