मेळघाटात मृत्यूचा पूल: खंडू नदीत ग्रामस्थाचा बळी
वनविभागाच्या अडथळ्यांमुळे विकास ठप्प

-ग्रामस्थांचा आक्रोश उफाळला
धारणी / 21 सप्टेंबर : मेळघाटातील विकासाची वचने आजवर केवळ कागदावरच घोटाळत राहिली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र झालेली नाही. परिणामी येथील दुर्गम भागातील लोकांना दररोज जीव धोक्यात घालून जगावे लागते. त्याचेच दुःखद उदाहरण शनिवारी खंडू नदीने पुन्हा एकदा ग्रामस्थाचा बळी घेतल्याच्या घटनेतून समोर आले. एकताई गावातील रहिवासी रावजी रोना बेठेकर हे खुटीदाजवळ नदी पार करत असताना प्रचंड पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि वाहून गेले. नंतर त्यांचा मृतदेह सुमिता पुलाजवळ सापडला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
गावकर्यांच्या संतापाला कारण देखील तितकेच गंभीर आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी (सीईओ) या भागाला भेट देऊन खंडू नदी स्वतः पार केली होती. त्यांनी शिक्षक आणि ग्रामस्थांना रोज जाणवणार्या या भीषण अडचणी जवळून अनुभवल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र, वनविभागाच्या परवानगीच्या अटीमुळे पुलाचे काम रखडले असून परिस्थिती पुन्हा ’जैसे थे’ राहिल्याचा आरोप गावकरी करत आहेत. सीईओंचे प्रयत्न सकारात्मक असले तरी वनविभागाची अनास्था आणि नौकरशाहीचा गोंधळ यामुळे दुर्गम भागातील विकास कामांवर गंडांतर आले आहे, अशी ग्रामस्थांची खंत आहे.
मेळघाटाच्या विकास कामांमध्ये वनविभाग परवानगीच्या नावाखाली मोठा अडथळा ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात येते. खंडू नदीवरील पुलाचाच प्रश्न नाही तर अनेक गावांना जोडणारे रस्ते, वीजपुरवठ्याच्या योजना हेही कामे अशाच कारणामुळे पथ्यावर पडले नाहीत. परिणामी अख्खी खेडी अंधारातच दिवस काढत आहेत. जंगल वाचवणे महत्त्वाचे आहे, मात्र जंगलात राहणार्या माणसांचे जीवन वाचवणे त्याहून महत्त्वाचे नाही काय, असा जळजळीत सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. रोज मृत्यूच्या सावटाखाली जगणे शासनाला आणि वनविभागाला कसे दिसत नाही, असा प्रश्न ते विचारत आहेत.
रावजी बेठेकर यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी शासनापुढे काही प्रमुख मागण्या ठाम शब्दांत ठेवल्या आहेत. सर्वप्रथम वनविभागाने अडथळे बाजूला करून पूल, रस्ते आणि वीजपुरवठ्याची कामे त्वरित सुरु करावीत. मृत बेठेकर यांच्या कुटुंबाला शासकीय सानुग्रह मदत जाहीर करण्यात यावी आणि या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या मते सीईओंनी दाखवलेल्या संवेदनशीलतेला वनविभागाच्या परवानगीच्या चक्रात खीळ बसू नये.
आणखी किती बळी द्यावे लागणार, तेव्हा हा पूल उभा राहणार, असा थेट प्रश्न गावकर्यांनी विचारला आहे. रावजी बेठेकर यांचा मृत्यू हा केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून मेळघाटातील विकासावर वनविभागाच्या कारणास्तव आलेल्या अडथळ्याचे जिवंत उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जंगलसंवर्धन ही आजची गरज असली तरी मानवजीवनाला सतत धोक्याच्या उंबरठ्यावर ठेवणे हा अन्यायच असल्याचे स्पष्ट होते. शासनाने तातडीने लक्ष घालून ठोस निर्णय घेतले नाहीत तर खंडू नदीसारख्या प्रवाही पाण्यांनी अजून कितीतरी निर्दोष जीव गिळंकृत करण्याचा धोका कायम राहील.




