बेलोरा विमानतळावर रात्रीच्या लँडिंगची प्रतीक्षा कायम

तांत्रिक सज्जतेनंतरही मुहूर्त टळला

बेलोरा धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू

अमरावती /6 एप्रिल– अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची तांत्रिक तयारी पूर्ण झाली असली, तरी प्रशासकीय मंजुरीअभावी ही सेवा रखडली आहे. मार्चमध्ये यंत्रणा बसवूनही एप्रिलचा मुहूर्त हुकल्याने प्रवाशांमध्ये अद्याप प्रतीक्षेचेच वातावरण आहे.
अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून दिवसाची विमान सेवा सुरू होऊन आता बराच काळ लोटला असला, तरी रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुविधा अद्यापही अधांतरीच आहे. या सुविधेसाठी एप्रिल महिन्याचा मुहूर्त वर्तवला जात होता, मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे ही सेवा पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अमरावतीकरांना रात्रीच्या विमान प्रवासासाठी अजून काही दिवस वाटच पाहावी लागणार आहे.
विमानतळावरून गेल्या वर्षापासून ‘एटीआर-72’ विमानांची सेवा सुरू झाली असून सध्या आठवड्यातून पाच दिवस विमानं झेपावत आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने रात्रीच्या उतरण्याच्या सुविधेसाठी गेल्या काही महिन्यांपासून कंबर कसली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यातच रात्रीच्या विमान उतरण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली ‘डीव्हीओआर’ आणि ‘एचपी डीएमई’ ही यंत्रणा यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली. तरीही प्रशासनाकडून ही सेवा नक्की कधी सुरू होईल, याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही. सध्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू असून इतर किरकोळ तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही सेवा सुरू झाल्यास जिल्ह्याच्या दळणवळणात मोठी क्रांती होईल, परंतु प्रशासकीय हिरव्या कंदिलाअभावी विमानांचे रात्रीचे उड्डाण लांबणीवर पडले आहे.
महत्त्वाची यंत्रणा सज्ज-बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमान उतरण्यासाठी लागणारी मुख्य उपकरणे मार्चमध्येच बसवण्यात आली आहेत. धावपट्टीच्या कामासह इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होत असून प्रशासनाकडून केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. ही सेवा सुरू झाल्यावर जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button