बच्चू कडू आज मुंबईत भूमिका मांडणार

शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी संधी

प्रहार अध्यक्षांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष 

अमरावती/28 एप्रिल- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त होणार्‍या नऊ जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी 30 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे राजकीय पाऊल उचलले असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आ. बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावावर आणि पुढील राजकीय वाटचालीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी माजी आ. बच्चू कडू आज सकाळी 11 वाजता मुंबईत महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. राज्यात आगामी काळात होणार्‍या निवडणुका पाहता, विदर्भ पट्ट्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे हे माजी आ. बच्चू कडू यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला आपल्या सोबत घेण्यास अत्यंत सक्रिय झाले आहेत. माजी आ. बच्चू कडू यांना आमदार करून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. या सर्व घडामोडींवर आ. बच्चू कडू यांनी सावध भूमिका घेतली असून, आज सकाळी 11 वाजता मुंबईत होणार्‍या पत्रकार परिषदेतच आपण सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या या निर्णयावर प्रहार जनशक्ती पक्षाची पुढील दिशा आणि राज्याची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या या प्रस्तावामुळे माजी आ. बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विदर्भातील राजकारणात आपला मोठा प्रभाव असलेल्या माजी आ. बच्चू कडू यांच्या या संभाव्य आमदारकीमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत माजी आ. बच्चू कडू शिवसेनेच्या शिंदे गटाचा हा प्रस्ताव स्वीकारणार की आपली वेगळी चूल मांडणार, हे स्पष्ट होणार आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम आगामी राजकारणावर होणार असल्याने अमरावतीपासून मुंबईपर्यंत सर्वच राजकीय कार्यकर्त्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button