आसरा मातेच्या मूर्तीचे चांदीचे डोळे लंपास
गांजाच्या नशेत समाजकंटकाचा संतापजनक प्रकार

पोलिसांच्या धाडसी कारवाईत आरोपी जेरबंद
पथ्रोट /7 जून – गावातील आसरा मातेच्या मंदिरात घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली होती. गांजाच्या नशेत एका समाजकंटकाने आसरा मातेच्या मूर्तीवर काठीने वार करून मूर्तीची हानी केली तसेच मूर्तीवरील चांदीचे डोळे काढून नेल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपीला अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी स्वतः मंदिरात जाऊन पूजा करून वातावरण शांत ठेवण्यास पुढाकार घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पथ्रोट येथील प्रभाग क्रमांक 2 मधील स्वरूपसिंह विद्यालयामागील वस्तीत आसरा मातेचे जुने मंदिर असून परिसरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान मानले जाते. नवरात्रोत्सवात येथे घटस्थापना केली जाते तसेच वर्षभर नागरिकांकडून नियमित पूजा-अर्चना केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरातील एक भोंदू महाराज मंदिर परिसरात गांजा सेवन करीत असल्याची तसेच मंदिराजवळ अस्वच्छ कृत्ये करीत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात होती. अनेकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उलट शिवीगाळ करून धमकावत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
शनिवारी रात्री गांजाच्या नशेत त्याने आसरा मातेच्या मूर्तीवर काठीने प्रहार करून मूर्तीचे नुकसान केले. यानंतर मूर्तीवरील चांदीचे डोळे काढून नेल्याचेही उघड झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अभय चौथनकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन मंदिराची स्वच्छता करून विधिवत पूजा केली. त्यामुळे परिसरातील तणाव निवळण्यास मदत झाली. यावेळी पोलीस पाटील, जमादार प्रवीण आगरकर, दहीकर, पोलीस कर्मचारी उमेश चव्हाण, उमेश मेश्राम तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
धर्मस्थळाचा अवमान सहन न करण्याचा संदेश-आसरा मातेच्या मंदिरातील मूर्तीची तोडफोड आणि चांदीचे डोळे काढून नेण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळात आरोपीला अटक केली. वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन मंदिरात पूजा करून शांततेचे आवाहन केले. तत्पर कारवाईमुळे संभाव्य तणाव टळला आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला.




