विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य
एमपीएससी पेपरफुटीची एसआयटीमार्फत चौकशी

विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला फडणवीस यांचे आश्वासन
’व्ही. राधा’ समितीची स्थापना
मुंबई /10 सप्टेंबर ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेल्या राज्यभरातील विद्यार्थी प्रतिनिधींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बैठक घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या संवेदनशीलतेने ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करत ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली.
आम्हाला संपूर्ण प्रणाली सुधारायची आहे, काहीही लपवायचे नाही. हा तपास शेवटच्या टप्प्यापर्यंत नेला जाईल, असा स्पष्ट विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.एमपीएससी परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा घडवूनआणण्यासाठी वरिष्ठ आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यभरात जाऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी थेट संवाद साधणार आहे. तसेच, औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणासह गट ’ब’ आणि गट ’क’ मुख्य व पूर्व परीक्षा 2025 ची सखोल चौकशी केली जाणार आहे. याशिवाय लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व संशयास्पद परीक्षांची चौकशी विशेष तपास पथकामार्फत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून गुन्हे शाखेचा प्राथमिक तपास अहवाल सार्वजनिक केला जाईल, तसेच माहिती अधिकारात उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याची शिफारस आयोगाला करण्यात येणार आहे. ज्या परीक्षांबाबत गंभीर तक्रारी आहेत, त्यांची फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत मुलाखती थांबवण्यात येतील. मुलाखतींसाठी निश्चित मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जातील. पीएमसी आणि एमएमआरडीए भरती परीक्षांचीही सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.





