4 पोलिस निलंबित, सीसीटीव्हीत 3 संशयित
न्यायाधीशांच्या बंगल्यांवर दरोडा प्रकरणी

अमरावती / 17 फेब्रुवारी : शहरातील अतिसंवेदनशील आणि सुरक्षित मानल्या जाणार्या कांता नगर भागात शनिवारी मध्यरात्री गुन्हेगारांनी अक्षरशः तांडव घातले. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी चक्क पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचार्यांच्या निवासावर एकाच वेळी डल्ला मारला. ’खाकी’चा पहारा असतानाही चोरट्यांनी घातलेला हा दरोडा म्हणजे अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या चार जवानांना तडकाफडकी निलंबित केल्याने संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती येथील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांता नगर परिसरात शनिवारी रात्री हा थरार घडला. चोरटे इतके निर्ढावलेले होते की ज्या घरांमध्ये न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंब हजर होते, त्या घरांची दारे त्यांनी बाहेरून बंद केली आणि त्यानंतर बंद घरांचे कुलूप तोडून आत शिरले. पोलीस सुरक्षा असतानाही नऊ घरांमध्ये शिरकाव करून या टोळीने सर्वत्र धुमाकूळ घातला. पळून जात असताना तीन संशयित चोरटे तेथील चित्रीकरण यंत्रणेत कैद झाले आहेत. या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल गुन्हे शाखेचे सचिन भोयर, कोतवालीचे प्रमोद हरणे, अथर बेग आणि पोलीस मुख्यालयाचे अभिषेक दीक्षित या चार जवानांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या चोरी प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी भातकुलीचे प्रभारी निरीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आली असून पोलीस आता या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने करीत आहेत.
आयुक्तांचा ’हॅमर’ चार जवानांचे निलंबन-कर्तव्यात कसूर करणार्यांवर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे सचिन भोयर, कोतवालीचे प्रमोद हरणे व अथर बेग तसेच पोलीस मुख्यालयाचे अभिषेक दीक्षित या चार जवानांचा समावेश आहे. सुरक्षा कवच भेदून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने या कर्मचार्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, या निर्णयामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.




