…तब्बल दिवसाला 10 हजार दुधाच्या लिटरची घट
भेसळीविरोधी कारवाईने संकलनात मोठा फटका

दुग्धव्यवसायावर वाढले भीतीची सावट
अमरावती /2 ऑगस्ट – शहर व जिल्ह्यात अन्न व औषध विभागाने भेसळीविरोधात राबविलेल्या कठोर धाडसत्राचा थेट परिणाम दुग्ध व्यवसायावर दिसू लागला आहे. जिल्ह्यातील दररोजच्या दूध संकलनात तब्बल 10 हजार लिटरची घट झाली असून अनेक ठिकाणी दूध संकलन कमी झाले आहे. कारवाईच्या भीतीमुळे काही विक्रेते आणि संकलकांनी व्यवहार कमी केल्याची चर्चा असून, शुद्ध दूध पुरवठा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमरावती जिल्ह्यात अन्न व औषध विभागाने गेल्या काही दिवसांत भेसळीविरोधात सलग धाडसत्र राबविले. या कारवाईत अनेक ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. नियमभंग आढळलेल्या प्रकरणांमध्ये कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दूध संकलन करणारे अनेक केंद्र चालक आणि विक्रेते अधिक सावध झाले आहेत. जिल्ह्यात दररोज होणार्या दूध संकलनात सुमारे 10 हजार लिटरची घट झाल्याचे चित्र पुढे आले आहे. काही ठिकाणी संकलन केंद्रांवर येणार्या दुधाचे प्रमाण कमी झाले असून, ग्रामीण भागातील उत्पादकांनाही त्याचा परिणाम जाणवत आहे. भेसळ करणार्यांवर कारवाईचे स्वागत होत असले तरी प्रामाणिक दूध उत्पादक आणि नियमित व्यवसाय करणार्यांमध्येही तपासणीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुग्ध व्यवसायाशी संबंधित जाणकारांच्या मते, नियमांचे काटेकोर पालन करून शुद्ध दूध ग्राहकांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवतानाच प्रामाणिक उत्पादक आणि संकलकांना विश्वासात घेणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि दूध संकलन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.




