टेम्पो विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू
माळशिरस परिसरात थरारक घटना

* दर्शनावरुन येतांना भाविकांवर काळाचा घाला
सोलापूर /14 जून: एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने एक कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातील उघड्या विहिरींचा प्रश्न उद्भवला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या भल्यामोठ्या विहिरीत पिकअप वाहन कोसळून एकाच क्षणात 14 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे.
सोलापूरच्या माळशिरसमधील म्हसवड – पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडीजवळ अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्व 14 जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन करून घरी जाणार्या 14 भाविकांवर काळाने झडप घातली. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडीजवळ या भाविकांची पिकअप येताच रस्त्याच्याकडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत ते कोसळले. ही घटना घडताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील भाविकांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावर परिस्थिती भीषण असून पिकअपमधील सर्वच भाविक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली आहे. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु झाले आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, खूपच दुर्दैवी अशी घटना आहे. मी देखील या संदर्भात माहिती घेत आहे. एवढ्या लोकांचा मृत्यू होत आहे आणि त्यातून अजून गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. पण आम्ही या संदर्भात माहिती घेत आहोत आणि मदत पोहोचवत आहोत. तसेच, विहीरीची माहिती देखील घेतली जाणार आहे. विहिरीला कठडा आहे की नाही तसेच जर नसेलच तर मग त्यावर कारवाई केली जाईल. रस्त्याच्या बाजूलाच विहीर आहे, तर त्याला कठडा असणे बंधनकारक आहे. पण जर कठडा नसेल तर चौकशी होईल आणि कारवाई होईल. कारवाई करणे हा विषय वेगळा आहे, पण 14 लोकांचा मृत्यू होणे हे अतिशय दुर्दैवी आहे.
अतिशय धक्कादायक अशी माहिती येत आहे. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन येताना पिकअप गाडी विहिरीत कोसळली. खरं तर कसे झाले, हे बघायला पाहिजे. कारण, विहिरीत ऑफ ट्रॅक जाऊन कोसळणे, हे कसे झाले याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अपघातात मृत झालेले 14 जण रांजणी गावातली होती. माझ्या मतदारसंघातील पंढरपूरातली होती. सोलापुरातील त्या मार्गावर असेल किंवा तुळजापूर मार्गावर असेल अपघातांचे प्रमाण वाढताहेत याची दखल घेणे गरजेचे आहे.




