कर्जमाफीची तारीख ठरली?

सहकार विभागाचा राज्य सरकारकडे अहवाल सादर

मुंबई/11 मे- राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सहकार विभागाने राज्यभरातील पात्र शेतकर्‍यांची माहिती संकलित करून राज्य सरकारकडे सादर केली असून, मेअखेर होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अंदाजे 34 ते 35 लाख शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. तसेच, पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 30 जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने राज्यातील बँकांकडून तब्बल 54 प्रकारची माहिती मागवली होती. यामध्ये बँकेची शाखा, आयएफएससी कोड, खाते क्रमांक, आधार क्रमांक, जमीन नोंदी, पीककर्ज, कर्जाची मुदत, परतफेडीची माहिती, व्याजाची रक्कम अशा विविध तपशीलांचा समावेश होता. ही माहिती 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांतील थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकर्‍यांबाबत गोळा करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जधारकांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. दीपक तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांकडून आवश्यक माहिती प्राप्त झाली असून ती सरकारकडे सादर करण्यात आली आहे. आता सरकारकडून पात्रतेचे निकष निश्चित केले जात आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळात अंतिम निर्णय होईल.

संबंधित बातम्या

Back to top button