संगणक परिचालकांच्या मानधनात वाढ करा

आ.बच्चू कडू यांची विधानपरिषदेत मागणी

मुंबई/30 जून-‘आपले सरकार सेवा केंद्र’ मार्फत राज्यातील ग्रामीण भागात संपूर्ण ऑनलाइन व डिजिटल कामकाज करणार्‍या ग्रामपंचायत संगणक परिचालकांना मिळणार्‍या मानधनाबाबत आमदार बच्चू कडू यांनी आज (30 जून) विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. बच्चू कडू यांनी संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सहाय्यक असा दर्ज देऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संगणक परिचालक संघटनांचे प्रतिनिधी, संबंधित आमदार व वरिष्ठ विभागीय अधिकार्‍यांची तातडीने एक संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक व सुवर्णमध्य साधणारा मार्ग काढण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
लक्षवेधी सूचनेद्वारे संगणक परिचालकांच्या मानधनाचा मुद्दा मांडताना बच्चू कडू म्हणाले की, ग्रामीण भागात तळागाळातील नागरिकांना डिजिटल सेवा पुरवणार्‍या संगणक परिचालकांना सध्या मिळणारे 10 हजार रुपये मानधन अपुरे आहे. त्यामुळे संगणक परिचालकांना ‘ग्रामपंचायत सहाय्यक’ असा दर्जा देऊन त्यांचे मानधन किमान 18 ते 20 हजार रुपये करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि खासगी कंपनीमार्फत फिरत जाणारा निधीचा प्रवास थांबवून,हे मानधन थेट ग्रामपंचायतीमार्फत परिचालकांच्या खात्यात जमा करावे, जेणेकरून संगणक परिचालकांना योग्य न्याय मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या चर्चेत आमदार प्रवीण दरेकर, भाई जगताप, प्रसाद लाड आदी सदस्यांनीही भाग घेत परिचालकांना कायद्यानुसार किमान वेतन देऊन दिलासा देण्याची मागणी केली. सरकारकडून बाजू मांडताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, संगणक परिचालक हे शासनाचे नियमित किंवा पारंपरिक कर्मचारी नसून त्यांना ग्राम उद्योजक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना दरमहा 10 हजार रुपये निश्चित मानधन दिले जाते. तसेच नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, जातीचे दाखले, घरकुल अर्ज आणि विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून देण्याच्या सेवांमधून संगणक परिचालकांना स्वतंत्र सेवा शुल्क मिळते. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तरीही संगणक परिचालकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत आमदार बच्चू कडू, परिचालक संघटनांचे प्रतिनिधी आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची एकत्रित संयुक्त बैठक घेऊन या संपूर्ण प्रकरणावर योग्य व सुवर्णमध्य साधणारा मार्ग काढण्यात येईल, असे जयकुमार गोरे यांनी जाहीर केले.

संबंधित बातम्या

Back to top button