मनोज जरांगेंविरुद्ध थेट ईडीकडे तक्रार
मराठा आरक्षणाच्या नावाखाली हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबई /10 सप्टेंबर- मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी मराठा आरक्षणाच्या नावाखाली प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला. बरीच अवैध संपत्ती जमवली. त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांविरोधात ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. मराठा आंदोलक अजय बारसकर यांनी जरांगेंवर गंभीर आरोप लावला आहे. या तक्रारीनंतर ईडी कार्यालयाने बारसकर यांना बोलावून तक्रारीची माहिती जमा केली. बारसकर यांनीही उपसंचालकांना भेटून त्यांची बाजू मांडली.
ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर बारसकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, मला ईडी कार्यालयाने तक्रारीबाबत बोलावले होते. तिथे मी जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांविरोधात उपलब्ध असणारे पुरावे दिले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी पांडुरंग तारक, किशोर गलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम कुरुंदकर, संजय कटारे, स्वप्निल तारक, बद्रिनाथ तारक आणि त्यांचे मेहुणे विलास खेडकर यासारखे अनेक सहकारी आहे. यांचा सगळ्यात मोठा धंदा वाळू माफियाचा आहे. वाळू धंद्याबाबत कारवाई करण्याचे अधिकार ईडीकडे आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच या लोकांनी करोडो रूपयांचा भ्रष्टाचार, ज्याची कल्पनाही करता येणार नाही. किमान 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार यात केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. ईडीकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या सगळ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावे. डिफेंडर गाड्या कुठून आल्या, लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पैसे कुठून आले, पांडुरंग तारक यांनी 50 एकर जमीन घेतली या सगळ्याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे असं अजय बारसकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमची नावे ज्यांना घ्यायची असेल तर त्यांनी घ्यावी. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊद्या. आमचं ईडीच्या अधिकार्यांना विनंती आहे. आम्हाला चौकशीसाठी कधीही बोलवा, आम्ही ईडी कार्यालयात चौकशीला यायला तयार आहोत. कर नाही त्याला डर कशाला…माझी ईडी, सीबीआय चौकशी करा, ब्रेन मॅपिंग असेल वा नार्को टेस्ट ती करा. आमची कोणतीही चौकशी करा. बारसकरांनी जे पुरावे आहेत ते सगळ्यांसमोर आणावे.





