पांढुर्णा गोटमारीत 1100 पेक्षा अधिक जखमी, 7 गंभीर : जाम नदीच्या जत्रेत प्रचंड गर्दी
दोन्ही पक्षांच्या संमतीने ध्वज मंदीरामध्ये, शांततेत पार पडली गोटमार

वरुड तालुक्याच्या सीमेवर पारंपारिक महोत्सव
पांढुर्णा /11 सप्टेंबर – मध्यप्रदेशातील पांढुर्णा ते सावरगाव दरम्यानच्या जाम नदीत परंपरेप्रमाणे गोटमार साजरी करण्यात आली. सकाळपासुन सुरु झालेली गोटमार सायंकाळी 6 पर्यंत सुरूच होती. शेवटी 6 वाजता पांढुर्णा वासियांनी झेंडा तोडला आणि अखेर माँ चंडिकेच्या मंदिरात पुजा करुन यात्रेची सांगता झाली. दिवसभर सुरु असलेल्या दगडफफेकीत 1100 पेक्षा अधिक खेळाडू जखमी झाले. ज्यामध्ये 7 गंभीर खेळाडुंना नागपुर येथे पुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये संजय घारपुरे, सचिन हाटेकर, पंकज बारमासे, सचिन नासरे, नितीन भादे, कैलास साहू, प्रितम राऊत यांचा समावेश आहे.
येथील गोटमार यात्रेला कोणी राजेशाहीमध्ये पेंढरी लोकांना शह देण्याकरीता गोटमार केल्याचे सांगतात तर कोणी पांढूर्णा आणि सावरगांवमध्ये एका युवक व युवतीचे सुत जुळल्याने प्रेमविवाह झाला होता तेव्हा काही लोकांनी या विवाहाला विरोध करतांना सावरगांवच्या वधूला पांढूर्ण्यात नेऊ नये म्हणुन गोटमार केल्याचा इतिहास आहे. तेव्हा या गोटमारीत नववधुसह मृत्यु झाल्याने दोघांचाही चंडीमातेच्या मंदीराजवळ समाधी दिली असल्यानेत्यांच्या स्मृतीचे प्रतिक म्हणुन ही गोटमार यात्रा शेकडो वर्षांपासुन आजतागायत सुरु असल्याचे सांगतात. पोळयाच्या दुस:या दिवशी मध्यप्रदेशातील पांढूर्णा येथे ऐतिहासीक अशी गोटमार केल्या जाते. पोळयाच्या दिवशी जंगलातुन पळसाच्या झाड आणल्या जाते, सोबतच एक झेंडा सुध्दा लावल्या जातो, रात्रीला रात्रभर भजन-पुजन करून पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान हा झेंडा पांढूर्णा आणि सावरगांवच्या मध्यावर असलेल्या जाम नदीमध्ये सुरेश कावले नामक ईसमाकडून नदीपात्रात रोवल्या जातो. त्यानंतर दुसरे दिवशी पांढूर्णा आणि सावरगांवचे नागरिक एकमेकांवर गोटमार करतात. या गोटमारीदरम्यान पांढूर्णा येथील हा झेंडा नदीपात्रातुन उचलुन नेतात. त्यानंतर मोठ्या गाजावाजात तो झेंडा चंडिमातेच्या मंदीरात नेल्या जातो, अशी या घटनेची आख्यायिका आहे. ही गोटमार करणा:या नागरिकांपैकी अनेक नागरिक अशिक्षीत आहेत तर त्यापैकी अनेक शेतकरी, शेतमजुर आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा आहे. ही गोटमार केव्हा सुरु झाली याबाबत कुठेही नोंद नाही. सदर झेंडा नदीपात्रामध्ये रोवणारे कावले यांच्या शेकडो वर्षांपासुनची ही पारंपारीक प्रथा कायम ठेवीत आहे. या गोटमारीत आतापर्यंत कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे, असे असतांना या गोटमारीप्रसंगी गोटा मारला नाही तर तो देवाला पावत नाही अशीही अंधश्रध्दा असल्याने चंडीमातेचा भक्त असलेला प्रत्येक नागरिक मात्र या गोटमारीत सहभागी होतो, विशेष म्हणजे गोटमार करणार्यांपैकी अनेक जण मद्य प्राशन करुन असतात. पांढुर्णा येथे 300 वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या गोटमार मेळ्याच्या नावाने चालत आलेल्या परंपरेला अनुसरुन आज आमदार निलेश उईके यांनी माँ चंडी मातेच्या मंदिरात जाऊन गोटमार जत्रेत प्रार्थना केली व लोकांशी संवाद साधला नंतर, गोटमार यात्रेत, नदीच्या मध्यभागी हात जोडून ध्वजावर पाच दगड फेकण्याची परंपरा पाळली गेली.
महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक येत असतात. यावेळी गोटमारमध्ये सहभागी होण्यासाठी पांढुर्णा आणि छिंदवाडा जिल्ह्या व्यतिरिक्त नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने लोक पांढुर्णा येथे पोहचले होते. दुपारपर्यंत एका अंदाजानुसार 15 हजारांहून अधिक लोक गोटमार यात्रेत पोहोचले होते. याशिवाय ही संख्या सातत्याने वाढत होती. जत्रेला समांतर गुजरी बाजार, हनुमंती वॉर्ड आणि शारदा मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात मनिहारी आणि मुलांच्या खेळण्यांची दुकाने पाहायला मिळाली. माँ चंडिका देवीच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत शेकडो लोकांनी दूरवरून राष्ट्रध्वजाचे पूजन केले.सायंकाळी 6 वाजता पांढुर्णा वासियांनी झेंडा तोडला आणि माँ चंडिकेच्या मंदिरात पुजा करुन यात्रेची सांगता झाली.





