मोफत सॅम्पल्स वाटणार्‍या कंपन्यांना होणार कठोर शिक्षा

शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी 5 कडक नियम

3 ते 10 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार
मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले

मुंबई /29 सप्टेंबर -एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट ’बेबी फूड’ (शिशू आहार) बनवणार्‍या बड्या कंपन्यांकडे वळवला आहे. बाजारात मिळणार्‍या डबाबंद दुधामुळे आणि आहाराच्या चुकीच्या जाहिरातींमुळे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं तुकाराम मुंढे म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नवजात बालकांच्या आहाराबाबत कठोर आदेश लागू केला आहे. या नव्या निर्णयामुळे मुलांसाठी आहार बनवणार्‍या उत्पादक, ब्रँड मालक आणि ई-कॉमर्स विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.6 महिन्यांपेक्षा लहान मुलांना केवळ आईचेच दूध मिळाले पाहिजे. आईचे दूध सर्वोत्तम, दुसरं काहीच नाही असे तुकाराम मुंढे म्हणाले. त्यांनी बेबी फूडच्या पॅकेजिंगवर ’आई आणि बाळाचा फोटो’ वापरण्यावर थेट बंदी घातली आहे. त्यासोबतच, उत्पादनावर आईचे दूध हेच शिशुसाठी सर्वोत्तम आहे हे छापण्यासह 5 कडक नियमांची अंमलबजावणी अनिवार्य केली आहे. नियमांचे उल्लंघन करून जाहिराती करणार्‍या किंवा डॉक्टरांच्या नावाने मोफत सॅम्पल्स वाटणार्‍या कंपन्यांवर आता 3 ते 10 लाख रुपयांचा दंड आणि थेट तुरुंगवासाची कारवाई होईल असा इशारा दिला. तुकाराम मुंढे म्हणाले, जेव्हा आपण ’सेव्ह फूड, सेव्ह ड्रग्स’ म्हणतो, तेव्हा लोकांना अन्न आणि औषधे पूर्णपणे सुरक्षित आणि शुद्ध मिळायलाच हवीत. एफडीएने आतापर्यंत 22 नियमावली ) आणि 11 कडक आदेश जारी केले आहेत. यापूर्वी 22 महिने ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी शाळांच्या संदर्भात नियम केले होते. आता 2 वर्षांखालील नवजात बालकांच्या आहाराबाबत राज्यभरात नवा आदेश लागू करण्यात आला आहे.

Back to top button