दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा
उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई /24 सप्टेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि शेतकर्यांना तातडीने मदत देण्यासाठी येत्या 2 ते 3 दिवसांत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. आज गुरुवारी (24 सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी ही मागणी करत सरकारकडून काही प्रश्नांची उत्तर मागत काही प्रमुख मागण्या सुद्धा केल्या आहेत. यावेळी त्यांनी मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार कोटींचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले होते, त्याचे काय झाले? त्यातील प्रत्यक्ष किती मदत शेतकर्यांना मिळाली? याची माहिती सरकारने द्यावी, अशी सुद्धा मागणी केली आहे.’
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीवर थेट भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता, तेव्हा जमिनी खरडून गेल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 31 हजार कोटींचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले होते. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपये जाहीर केले होते. माझा सरकारला पहिला प्रश्न हाच आहे की, या 31 हजार कोटींपैकी खरोखर किती मदत प्रत्यक्ष शेतकर्याच्या हातात पोहोचली आहे,





