इराणच्या युद्धनौकेवर हिंदी महासागरात अमेरिकेचा हल्ला
80 जणांचा मृत्यू अनेक जण बेपत्ता

नवी दिल्ली/4 मार्च : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या एका अण्वस्त्रसज्ज पाणबुडीने इराणची युद्धनौका आयआरआयएस देना ही टॉर्पेडोचा हल्ला करुन बुडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात किमान 80 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, दुसर्या महायुद्धानंतर एखाद्या शत्रू राष्ट्राची युद्धनौका टॉर्पेडोने बुडवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही युद्धनौका काही दिवसांपूर्वीच भारतात सरावासाठी आली होती.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पिट हेगसेथ यांनी या हल्ल्याची पुष्टी दिली. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात स्वतःला सुरक्षित समजणार्या इराणच्या युद्धनौकेला आमच्या पाणबुडीने जलसमाधी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणार्या युनिटच्या म्होरक्याला काल कंठस्नान घालण्यात आले. इराणने ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण अखेर विजय आमचाच झाला आहे, असे हेगसेथ यांनी सांगितले. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, इराणची माऊज-क्लास फ्रिगेट आयआरआयएस देना ही युद्धनौका बुडाली. श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपासून 40 नॉटिकल मैल दूर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात हा हल्ला झाला. या जहाजावर सुमारे 180 नौसैनिक होते. श्रीलंकन नौदलाने आतापर्यंत 32 जणांना सुखरूप वाचवले असून अनेकांचे मृतदेह हाती लागले आहेत. जखमींवर गाले इथल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विशेष म्हणजे, ही इराणी युद्धनौका भारतात आयोजित इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026 आणि मिलन 2026 या नौदल सरावात सहभागी होऊन परतत होती. विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाने या जहाजाचे जंगी स्वागत केले होते. 18 ते 25 फेब्रुवारी दरम्यान बंगालच्या उपसागरात झालेल्या सरावानंतर ही नौका परतीच्या प्रवासाला निघाली होती.




