दुसर्‍या पतीकडून पिंकीची निर्घृण हत्या

सिलबट्ट्याने झोपेतच प्राणघातक वार

* क्राईम ब्रँचची तपासातून मोठी कामगिरी

अमरावती /2 डिसेंबर – संताजी नगरालगतच्या गुरूकृपा कॉलनीत रविवारी उघडकीस आलेल्या निलीमा उर्फ पिंकी खरबडे हत्याकांडावरून पडदा उचलत क्राईम ब्रांचने तिच्या दुसर्‍या पती नितीन इंगोले याला अटक केली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास, चौकशी आणि घटनास्थळावरील सूक्ष्म शोधयात्रेतून आरोपीपर्यंत पोहोचत या संवेदनशील प्रकरणाचा थरारक उलगडा केला.
पिंकीचा पहिला पती मरण पावल्यानंतर ती गुरूकृपा कॉलनीत एकटी राहत होती. या काळात अर्जुन नगरातील नितीन इंगोले याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांनी तडजोडीच्या परिस्थितीत विवाह केला. मात्र नितीन विवाहित असल्याने त्याने पिंकीला स्वतंत्र घरातच राहण्याचा आग्रह धरला. पिंकी मात्र पतीसोबतच राहण्याचा हट्ट करत होती. या वादातूनच दुर्दैवी शेवटाची बीजे रोवली गेली. घटनेच्या आदल्या रात्री नितीन पिंकीच्या घरी आला होता. पिंकीने घरातील केअरटेकर अशोक खंडारे याला बाहेर पाठवून स्वतःच बंद दरवाज्यात नितीनसोबत रात्री घालवली. वाद पुन्हा चिघळताच नितीनने झोपेत असलेल्या पिंकीवर सिलबट्ट्याने प्राणघातक प्रहार केले आणि तिची निर्दय हत्या करून घटनास्थळावरून पसार झाला. आरोपीने पिंकीचा दूरध्वनी आणि नोंदणी यंत्रही सोबत नेले. रविवारी सकाळी केअरटेकरला घराचे फाटक उघडे दिसले. अनेकदा आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने तिच्या भावाला खबर दिली. घरात मृतदेह सापडताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.क्राईम ब्रांचचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने पिंकीच्या दूरध्वनी नोंदी, तिच्या शेवटच्या संपर्कातील व्यक्ती, घरातील साक्षीदार अशोक यांची चौकशी, तांत्रिक विश्लेषण या सर्वांचा वेध घेत तपासाची दिशा ठरवली. अनेक चौकशीनंतर नितीनवर संशयाची साखळी मजबूत झाली. अखेर कठोर चौकशीदरम्यान त्याने अपराधाची कबुली दिली. सध्या आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. पिंकी हत्याकांडाने गुरूकृपा कॉलनी हादरली असून, वैवाहिक संघर्षातून जन्मलेल्या या दुर्दैवी प्रकरणाने शहरात चांगलीच खळबळ माजवली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button