जिल्ह्यातील एक नगराध्यक्ष, 5 न.प.च्या आठ सदस्यांची निवडणूक स्थगित

अपील प्रकरणांचे निकाल उशिरा लागल्याने राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

सुधारित कार्यक्रमानुसार नवीन तारखा जाहीर होणार

अमरावती /30 नोव्हेंबर : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषद अध्यक्षपदासह पाच नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीतील एकूण आठ प्रभागांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अपील प्रकरणांचे निकाल 22 नोव्हेंबर 2025 नंतर जाहीर झाल्याने आयोगाने मूळ निवडणूक कार्यक्रम रद्द करून सुधारित कार्यक्रम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु ज्याठिकाणी प्रलंबित अपीलांचे निकाल 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर देण्यात आले, अशा प्रभागांतील निवडणुका घेऊ नयेत, असे आयोगाने स्पष्ट केले. तसेच जर अपील अध्यक्षपदाशी संबंधित असेल, तर संपूर्ण नगरपरिषद निवडणूक थांबविण्याचे निर्देश देण्यात आले. हा निर्णय 29 नोव्हेंबर रोजी आदेशाने लागू करण्यात आला.
जिल्ह्यात स्थगित झालेल्या जागांमध्ये दर्यापूर नगरपरिषदेचा प्रभाग क्र. 2 अ, अचलपूर नगरपरिषद प्रभाग क्र. 10 अ आणि 19 ब, वरुड नगरपरिषद प्रभाग क्र. 12 अ, अंजनगाव सुर्जी नगरपरिषद प्रभाग क्र. 6 अ आणि 7 ब, धारणी नगरपंचायत प्रभाग क्र. 14 आणि 16 यांचा समावेश आहे. शिवाय, अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत अध्यक्षपदा सोबत सर्व सदस्य पदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आशिष यांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली. हा निर्णय जाहीर होताच संबंधित शहरांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. अंजनगाव सुर्जी येथे अध्यक्षपदाची निवडणूक ठप्प झाल्याने प्रमुख पक्षांना नव्याने रणनीती आखावी लागत आहे. काही ठिकाणी संभाव्य उमेदवार संपर्क मोहीम थांबवून नवीन वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रलंबित अपील प्रकरणांची संख्या वाढत असल्याने निवडणूक प्रक्रियेवर वारंवार परिणाम होत आहे. न्यायालयीन निर्णय उशिरा लागल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले. काही प्रभाग जिल्ह्यातील राजकीय दिशा ठरविणारे मानले जात असल्याने या स्थगितीचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राज्य निवडणूक आयोग सुधारित कार्यक्रम तयार करत असून, त्यानुसार नवीन उमेदवारी, मतदान आणि मतमोजणीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. तोपर्यंत संबंधित नगरपरिषदांमध्ये प्रशासकीय कामकाज पूर्ववत राहणार आहे.

असा असेल सुधारित निवडणूक कार्यक्रम?

* नामनिर्देश मागे घेण्याची
अंतिम मुदत 10 डिसेंबर
* चिन्ह वाटप व अंतिम
यादी 11 डिसेंबर
* मतदान 20 डिसेंबर
* मतमोजणी 21 डिसेंबर ..
* 23 डिसेंबर पूर्वी
प्रक्रिया होणार पूर्ण

संबंधित बातम्या

Back to top button