मतदानादिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने निर्णय

मोर्शी /30 नोव्हेंबर – येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी मोर्शी नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि कोणताही अडथळा न येता पार पाडण्यासाठी मंगळवार, 2 डिसेंबर रोजीचा मोर्शी शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, मतदानाच्या दिवशी शहरात आवश्यक ती कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतुकीची उपलब्धता वाढवणे आणि नागरिकांना मतदानासाठी अडथळेविना पोहोचता यावे यासाठी हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषद निवडणूक हा नागरिकांचा महत्त्वाचा लोकशाही उत्सव असल्याने प्रशासनाने सर्व तयारी वेगात सुरू केली आहे. जिल्हाधिकार्यांनी संबंधित पत्रात नमूद केले आहे की, आठवडी बाजार भरल्यास शहरात मोठी गर्दी निर्माण होते. त्यामुळे वाहतूक कोंडी, सुरक्षा व्यवस्था आणि मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्यवस्थापन सुरळीत राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिक, व्यापारी आणि बाजारातील सर्व दुकानदारांनी हा निर्णय लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सभोवतालची वाहतूक व गर्दी नियंत्रणात राहावी, मतदानाला नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा आणि निवडणूक कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.




