64 वी मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा अंतिम टप्प्यात
चक्रव्यूह नाटकाचे बहारदार सादरीकरण

अमरावती /28 नोव्हेंबर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 64 वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी अमरावती येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पं. दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे सुरवात झाली असून स्पर्धा आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे.
शुक्रवार दि. 28 रोजी स्व . साहेबरावजी गोरडे बहुउद्देशीय संस्था, अमरावती या संस्थेचे चक्रव्यूह हे डॉ . पराग घोंगे लिखित आणि सतीश पवार दिग्दर्शित नाटक सादर झाले. या नाटकात रोनल फुलझेले, भावना ढवळे, प्रफुल दातीर आणि अक्षय मिश्रा यांनी अभिनय स केला आहे. या नाटकाचे नेपथ्य – नीरज वाटपाडे, पार्श्व संगीत – श्रेयस गुल्हाने / अनिकेत बेगडे, प्रकाशयोजना – अशोक कार्लेकर, रंगभूषा आणि वेशभूषा – नेहा बुच्चे व संजना पचगडे यांनी केली आहे. नाटकाची थोडक्यात कथा म्हणजे स्वतःच्याच चक्रव्युहात अडकलेला नाटकातील नायक त्या चक्रव्यूहा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि कथानक त्याच्या भोवती फिरते. इतर सह कलावंत त्या नायकाला पूरक आहेत. वयस्क प्राध्यापक असलेला तो वयाने आपल्यापेक्षा खूप लहान असलेल्या आपल्याच विद्यार्थिनीच्या प्रेमात पडतो, ती विद्यार्थिनी सुद्धा त्याच्या प्रेमात भरकटते आणि त्या प्राध्यापकाचा पत्रकार मित्र त्या दोघांनाही या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण त्या दोघांचे लग्न होतेच असे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचे पैलू या नाटकात बघायला मिळतात. सांस्कृतिक कार्य मंत्री ड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये दि . 29 रोजी स्पर्धेचा शेवटचा दिवस असून सकाळी 10.00 वाजता युवाजागर कला केंद्र या संस्थेचे अपराजित हे नाटक आणि सायंकाळी 7.00 वाजता अभिरुची कला व क्रीडा मंदिर या संस्थेचे श्वेतवर्णी शामकर्णी हे नाटक सादर होईल. सायंकाळी स्पर्धेचा समारोप अमरावती जिल्हा नाट्य परिषदेचे अध्यक्ष ड. चंद्रशेखर डोरले यांच्या उपस्थितीत होईल. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे. या स्पर्धेतील या दोन्ही नाटकांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन समन्वयक विशाल फाटे यांनी केले आहे.




