ऋषी खापेकर हत्याकांडाचा तपास गतीने; आरोपींची संख्या नऊवर

अमरावती /27 नोव्हेंबर : बडनेरा – अमरावती शहरात थरकाप उडवणार्या 27 वर्षीय ऋषी खापेकर हत्याकांडानंतर दोन दिवसांत घडामोडींना वेग आला असून पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी पाच जणांना अटक केली आहे. या खूनप्रकरणातील आरोपींची संख्या आता नऊवर पोहोचली असून त्यामध्ये तीन अल्पवयीन आणि तीन महिलांचा समावेश आहे. गुन्हे शाखा व बडनेरा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने सावता मैदान आणि विठ्ठलवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. विठ्ठलवाडी संकुलातील एक टोळी अचानक वस्तीमध्ये शिरली आणि घरात घुसून ऋषी खापेकर यांना जबरदस्ती बाहेर ओढून नेले. काही क्षणातच चाकूंच्या सपाट्यात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. वस्तीत दहशतीचे सावट पसरत असताना, घराच्या बाहेर रक्ताचा सडा, फूटलेल्या लाइटच्या काचांवर पाय ठेवणारे लोक आणि दरवाज्याजवळ उभे असलेले घाबरलेले शेजारी – संपूर्ण दृश्य गुन्हेगारी टोळ्यांच्या बेभान हिंमतीची साक्ष देत होते.
प्रारंभी बडनेरा पोलिसांनी शेख तौफिक शेख शकूर (21) आणि तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले. परंतु स्थानिक नागरिकांचा आरोप होता की हल्ल्यात महिलांसह किमान 10 ते 12 जण सामील होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून ठाण्यात प्रचंड गोंधळ माजला. मृतकाचे नातेवाईक तसेच संतप्त नागरिकांनी पोलिसांवर तातडीची कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आणला. सर्व आरोपी अटक झाल्याशिवाय अंत्य संस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका कुटुं बीयांनी घेतली होती. काही महिला तर थेट ठाण्यात घुसून आमच्यासमोर आरोपी दाखवा अशी मागणी करत संताप व्यक्त करत होत्या.
दरम्यान, सावता मैदानाजवळ काही युवकांनी रस्ता रोको करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणाव अधिक वाढला. परिसरात राजकीय दिग्गजांचीही धावपळ सुरू झाली. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सुपूर्द केले. यावेळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे व शाम घुगे यांनी स्वतः उपस्थित राहून त्वरित कारवाईचे आश्वासन दिले. या सर्व घडामोडीनंतर गुन्हे शाखेचे संदीप चव्हाण व बडनेरा ठाण्याचे निरीक्षक प्रफुल्ल गीते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. सलग शोधमोहीम, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी समीर शाह मुश्ताक शाह (25), अतिक चाऊस (20) आणि तीन महिलांना ताब्यात घेतले. यानंतर आरोपींची संख्या नऊपर्यंत वाढली असून तपासात अजून काही नावे पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. तपासात वैयक्तिक वाद, टोळीगत रुसवे-फुगवे अथवा बडनेरातील जुन्या वैमनस्याचा धागा उजेडात येऊ लागला आहे. परंतु या प्रकरणामागे आणखी खोलवरची गुन्हेगारी संलग्नता असल्याचा संशयही पोलिस तपास पथकाला आहे. परिसरातील वातावरण अद्याप तणावपूर्ण असले तरी वाढीव सुरक्षा तैनातीमुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
आरोपींची भर वस्तीमध्ये धिंड काढा आणि धुलाई करा-आ.रवी राणा
हत्येनंतर दुसर्याच दिवशी बडनेरात दाखल झालेले आमदार रवी राणा यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला. मृतक ऋषीच्या घरातील करुण परिस्थिती पाहताच राणा संतापले. कुटुंबाशी संवाद साधताना त्यांनी वस्तीतील गुन्हेगारी वाढीबद्दल पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी प्रत्यक्ष पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना फटकारले आणि त्याच क्षणी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना दूरध्वनीवरून आदेश दिले-आरोपींची भरवस्तीत धिंड काढा. धुलाई करा. बडनेरातील गुन्हेगारांना वठणीवर आणा. हे प्रकरण दबवले जाणार नाही.मृतकाच्या परिवाराला राणांनी वैयक्तिकरित्या 1 लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली. त्यांच्या या भूमिकेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतोषाची भावना पसरली असून पोलिसांवरही गुन्हेगारांना जलदगतीने गजाआड करण्यासाठी दडपण वाढले आहे.




