एन्काउंटरच्या भीतीने 41 नक्षलवाद्यांची शरणागती

बिजापूर– छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या वाढत्या मोहिमेने नक्षलवाद्यांचे मनोबल ढासळले असून मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पणाची लाट दिसत आहे. अलीकडील हिडमा चकमकीनंतर दबाव अधिक तीव्र झाल्याने उच्चस्तरीय नक्षल कमांडरही घाबरले आहेत. काहींनी आत्मसमर्पणा साठी वेळ मागितला, तर अनेकांनी थेट शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर बिजापूरमध्ये एकाच दिवशी तब्बल 41 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून त्यातील 32 जणांवर मिळून 1 कोटी 19 लाख रुपयांचे मोठे बक्षीस जाहीर होते. बिजापूर येथे वरिष्ठ अधिकार्यांसमोर आत्मसमर्पण केलेल्या या गटात 12 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश होता. जिल्हा पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले की सरकारच्या ‘पुना मार्गेम’ म्हणजेच पुनर्वसन व समाजात पुनर्समावेशकता वाढविणार्या उपक्रमाचा प्रभाव या प्रक्रियेत ठळकपणे जाणवतो.




