अखेर अपक्ष उमेदवारांंना झाले चिन्हांचे वाटप
चार दिवसांत प्रचार करण्याची कसरत

* अल्पावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड
परतवाडा/26 नोव्हेंबर – अचलपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात वेग वाढत असतानाच, अपक्ष उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरलेला चिन्हवाटपाचा टप्पा अखेर आज (26 नोव्हेंबर) पूर्ण झाला. तब्बल सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या चिन्हामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला असला, तरी अल्पावधीतच मतदारांपर्यंत चिन्हाची ओळख पोहोचवण्याची धांदल आता सुरू झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेत या वर्षी अनेक विलंब पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज माघारीची तारीख 21 नोव्हेंबर असतानाच सामान्यतः याच दिवशी चिन्हवाटप केले जाते. मात्र यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या कालावधीनंतर चिन्ह वाटप झाल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. पक्षीय उमेदवारांनी आधीच निश्चित चिन्हांच्या जोरावर प्रचार सुरू ठेवला असताना, अपक्षांना मात्र सहा दिवस नाव व वैयक्तिक ओळख यांवरच अवलंबून राहावे लागले. आज झालेले चिन्हवाटप झाल्यानंतर उद्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत अवघे चार दिवसच प्रचारासाठी उपलब्ध आहेत. 30 नोव्हेंबर रोजी रात्री प्रचाराची मुदत अधिकृतरीत्या संपणार असल्याने उमेदवारांना आता द्रुतगतीने जनसंपर्क वाढवावा लागणार आहे. अपक्ष उमेदवारांच्या मते, चिन्हाशिवाय सहा दिवस प्रचार करणं अवघड होतं. आता फक्त चारच दिवसांत चिन्हाची ओळख जनतेपर्यंत पोहोचवावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, चिन्ह मिळताच शहरात अपक्ष उमेदवारांनी प्रचाराची गती वाढवली असून घराघरांत भेटी, सोशल मीडिया मोहीम, पोस्टर-बॅनर, प्रचार रॅली यांना आता वेग आल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा ताप वाढत असून येणारे चार दिवस उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहेत.




