अपघातात जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यु

चांदुर रेल्वे / 4 जून: 21 मे रोजी औरंगाबाद-नागपूर हायवेवर तालुक्यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंद्रभागा नदीच्या पुलावर घडलेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यु झाला. अनिकेत भिमराव जगताप (28, रा. जवळा, ता. चांदुर रेल्वे) असे मृतकाचे नाव आहे. भर पावसात दुचाकी स्लिप होवून अनिकेतचा अपघात झाला होता.
21 मे रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुसळधार पाउस सुरु असताना अनिकेत आपल्या एमएच 29 / क्यु 1173 क्रमांकाच्या दुचाकीने घुईखेड येथून आपल्या जवळा या गावाकडे जात होता. वाटेत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर चंद्रभागा नदीच्या पुलावर त्याची दुचाकी स्लिप झाली आणि अनिकेत रस्त्यावर कोसळला. त्याच्या छाती, डोळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र पंधरा दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर अनिकेत जगतापचा मृत्यु झाला.