अवैध सावकाराच्या दबावतंत्रामुळेच विशालचा मृत्यू

वडिल प्रभाकर चचाणे यांची पोलिसांत तक्रार

वरुड । 23 नोव्हेंबर – येथून जवळच असलेल्या वघाळ येथील 19 वर्षाच्या युवकाचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला होता, परंंतु त्याचा मृत्यू हा अवैध सावकाराच्या दबाव तंंत्रामुळे झाल्याचा आरोप मृतक विशालचे वडील प्रभाकर चचाणे यांनी केला असून या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या 13 नोव्हेंबर रोजी विशाल प्रभाकर चचाणे या 19 वर्षीय युवक गावालगत असलेल्या पीरबाबा दर्गा नजीक जळालेल्या स्थिती आढळून आला होता. विशालला गंभीरावस्थेत त्याच्या नातेवाईकांनी सर्वप्रथम वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात व तेथून पुढील उपचार करता नागपूरकडे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. विशालचा नेमका मृत्यू कसा झाला? त्याने आत्महत्या केली की त्याचे हत्या झाली? याबाबत कुटुंबियांना साशंकता निर्माण झाल्याने आणि या संदर्भात अधिक माहिती काढली असता विशालने अवैध सावकारांकडून काही प्रमाणात पैसे व्याजाने आणले होते परंतु ते पैसे तो परत देऊ न शकल्यामुळे ते वारंवार घरी येऊन विशालला पैसे परत करण्यासंदर्भात धमकी देत होते, अशी माहिती पुढे आल्याने याप्रकरणी त्याचे वडील प्रभाकर चचाणे यांनी मंगेश महादेव कावनपुरे रा.वघाळ व चेतन माकोडे रा.तारा सावंगा यांच्याविरुद्ध बेनोडा शहीद पोलिसात तक्रार दिली असून या अवैध सावकारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे विशाल जेव्हा जळालेल्या स्थितीत आढळला तेव्हा त्याच्या बाजुला त्याचा मोबाईल आढळून आला होता परंंतु काही वेळानंतर तो मोबाईल फुटलेला स्थितीत आढळून आला, असेही कुटुंबियांचे म्हणणे आहे, त्यामुळे विशालचा मृत्यू हा संशयास्पद असून या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रभाकर चचाणे यांनी पोलिसांकडे केली आहे. विशाल हा अवघ्या 19 वर्षाचा होता वडील सतत आजारी राहत असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती आणि तो जे मोलमजुरीतून कमाई करत होता त्याच्याच भरवशावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता, त्यामुळे विशालच्या अचानक मृत्यूमुळे चचाणे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button