अतुल पुरी हत्याकाडांतील मुख्य आरोपी अक्षय शिंपी अटक
तीन महिन्यांपासून फरार; अमरावती गुन्हे शाखेची मुंबईत कारवाई

अमरावती/23 नोव्हेंबर – बडनेरा परिसरातील अतुल पुरी हत्येतील फरार आरोपी अक्षय प्रदीप शिंपी (वय 30, रा. गणेडीवाल लेआऊट, कॅम्प, अमरावती) याला अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईच्या चेंबूर परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी गुन्हा घडल्यानंतर सलग तीन महिन्यांपासून फरार होता.
22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारास 9 वाजता तिलक नगर रोड, बडनेरा येथे अतुल ज्ञानदेव पुरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर पोलीस स्टेशन बडनेरा येथे अप. क्र. 413/2025, कलम 302 भा.दं.वि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर समांतर तपास करत गुन्हे शाखेने आतापर्यंत 5 आरोपी आणि 3 विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला, मात्र मुख्य आरोपी अक्षय शिंपी हा सतत ठिकाणे बदलून फरार राहिला. त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने पाळत आणि गुप्त माहिती जाळे सक्रिय ठेवले. 22 नोव्हेंबर रोजी आरोपी मुंबईच्या चेंबूर परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सपोनि महेश इंगोले यांच्या पथकाला मुंबई रवाना करण्यात आले. पाळत व नियोजनबद्ध कारवाईत आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळाले. आज आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन बडनेरा यांच्या ताब्यात देण्यात आले. हि कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय व गुन्हे रमेश धुळाळ व सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बचाटे यांनी देखरेख केली. कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सपोनि महेश इंगोले, अंलदार गजानन ठेवले, मंगेश परिमल, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, संग्राम भोजने, योगेश पवार, संदीप खंडारे व प्रभात पोकळे यांचा समावेश होता.




