नगराध्यक्षपदाच्या प्रचारासाठी 11 लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा

नगरसेवकांना 3.50 लाख रुपये खर्च करावा लागणार

अमरावती/ 23 नोव्हेंबर -नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्यात आली आहे. वाढलेली महागाई आणि प्रचार खर्चाचे वास्तव लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सुधारित दर लागू केले आहेत. त्यानुसार, आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपल्या प्रचारावर 11 लाख 25 हजार रुपये खर्च करता येणार असून, नगरसेवक पदासाठी 3 लाख 50 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी दिली.
दर्यापूर शहरातील ’क’ दर्जा पालिकेच्या निवडणुकीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करत आहेत. थंडीच्या लाटेसोबतच शहरात निवडणुकीचा ज्वर वाढत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार सर्वच पक्षांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला आपला रोजचा निवडणूक खर्च संबंधित यंत्रणेकडे लेखी स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. वाढलेल्या खर्चाच्या मर्यादेमुळे प्रचार साहित्याच्या खर्चिक बाबी सांभाळणे उमेदवारांना शक्य झाले आहे. तरीदेखील, उमेदवारांनी आपले आर्थिक व्यवहार कायदेशीर चौकटीत ठेवून निवडणुकीतील खर्चाचे नियमन करावे, अशा निवडणूक यंत्रणेच्या सूचना आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने सव्वा अकरा लाखांपेक्षा अधिक आणि सदस्य पदाच्या उमेदवाराने साडेतीन लाखांपेक्षा अधिक खर्च होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे कळविण्यात आले आहे. या निवडणुकीत काही सामाजिक कार्याची आवड असणारे नवीन चेहरे, तर काही अनुभवी नेते नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात तीन स्थिर पथके, एक फिरते पथक आणि एका व्हिडिओ चित्रीकरण पथकाचा समावेश आहे. प्रत्येक पथकात एक पोलिस कॉन्स्टेबल आणि व्हिडिओ चित्रीकरण करणारा कर्मचारी आहे.

संबंधित बातम्या

Back to top button