घराचे कुलूप तोडून 2 लाखांचा मुददेमाल लंपास
शहरातील शाकुंतल विहार परिसरातील घटना

वरुड । 23 नोव्हेंबर – घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण 2 लाख 4 हजार 196 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील शाकुंतल विहार परिसरात घडली सविस्तर माहिती नुसार, शहरातील शाकुंतल विहार परिसरातील रहिवासी गोविंद शिवकुमार खंडेलवाल हे कुटुंबासोबत नातेवाईकांची तब्येत खराब असल्याने 13 नोव्हेंबर रोजी मोवाड येथे गेले होते. 17 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घरी परत आल्यानंतर मेन गेट उघडे दिसले व आत मधले दार उघडलेले दिसले, आत मध्ये जाऊन बघितले असता घरातील लोखंडी कपाट फुटले दिसले व घरातील सामान अस्ताव्यस्त आढळून आले. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र 15 ग्रॅम, कानातील रिंग 5 ग्रॅम, दोन सोन्याचे एक ग्रॅमचे शिक्के, दोन ग्रॅमचा सोन्याचा एक शिक्का, पाच ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे 40 ग्रॅमचे शिक्के व 140 ग्रॅम चांदीच्या तोरड्या, दोन चांदीचे बार व नगदी 80 हजार रुपये असा एकूण 2 लाख 4 हजार 196 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी गोविंद शिवकुमार खंडेलवाल (57) यांचे फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 331 (3), 331 (4), 305 (अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



