‘सखी ग सखी’ एक आगळीवेगळी नाट्यकृती
फक्त महिलांनीच साकारली बहारदार भूमिका

* नाटयप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती /23 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 64 वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी अमरावती येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ.पं.दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे सुरवात झाली असून रविवार दि. 23 रोजी समर्पण बहुउद्देशीय संस्था, टाकरखेडा संभु (भातकुली) या संस्थेचे सखी ग सखी हे फक्त स्त्री कलावंतांचा सहभाग असलेले डॉ.पराग घोंगे लिखित आणि किशोर पाचकवडे दिग्दर्शित नाटक सादर झाले.
या नाटकात आचल गजभिये, सोनू तारपुरे, काजल देशमुख, मयुरी राणे आणि प्रियांका नवाथे यांनी अभिनय स केला आहे. फक्त महिला कलावंत असलेल्या या नाटकाचे नेपथ्य-रिंकू सरोदे, पार्श्व संगीत-प्रज्वल तायडे, प्रकाशयोजना-सागर उदासी, रंगभूषा-रवीना भुरभुरे आणि वेशभूषा-कुंदाताई वंजारी यांनी केली आहे. नाट्यप्रयोगाची सुरवात म्हणजे रंगमंचावर एक टॉक शो सुरू असतो जो केवळ स्त्रियांसाठी आणि स्त्रियांच्या अनुभवावर आधारित असतो. या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्रगल्भ आणि समजूतदार आहे. स्त्रीच्या व्यावसायिक आणि वैय्यक्तिक प्रवासातले सत्य, माध्यमांचा प्रभाव आणि स्त्रीच्या प्रतिमेवरचा परिणाम, संघर्ष, वाट बघणं, प्रामाणिकपणा आणि आकांक्षा यांचा ताळमेळ दाखवण्याचा प्रयत्न या नाटकात दिसून येतो. संवादप्रधान असलेले हे नाटक आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धे करिता सोलापूरचे श्री गुरु वाठारे, जळगांवचे मुकुंद महाजन आणि अलिबाग येथून आलेल्या श्रीमती विजया कुडव हे शासनाने पाठवलेले परीक्षक काम सांभाळत आहेत. या स्पर्धेमध्ये दि. 24 रोजी अंबापेठ क्लब या संस्थेचे अॅड. प्रशांत देशपांडे निर्मित वारकरी हे नाटक सादर होईल. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे. या स्पर्धेकरिता तिकिटांचा दर अतिशय अल्प असून रोज 10/- आणि 15/-फक्त असणार आहे. अशी माहिती स्पर्धा समन्वयक विशाल फाटे, सह समन्वयक कल्याणी मांडवगडे आणि निलेश पंचारिया यांनी दिली आहे.




