अमरावती येथे 64 व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला ऊत्स्फूर्त प्रतिसाद

रंगतदार नाट्यकृतींमुळे प्रेक्षकांची वाढती उपस्थिती

अमरावती /21 नोव्हेंबर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 64 वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी अमरावती विभागात 14 नोव्हेंबरपासून उत्साहात सुरू झाली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ. प. दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेने सुरुवातीपासूनच रसिकांचे लक्ष वेधून घेतले असून, दिवसेंदिवस प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. नाट्यकृतींच्या दर्जेदार सादरीकरणामुळे प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आयोजकांसाठी उत्साहवर्धक ठरत आहे.
गुरुवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी गंधर्व नाट्य संस्थेचे जेंडर अ‍ॅन आयडेंटिटी हे नाटक रंगमंचावर सादर झाले. डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित आणि दिग्दर्शक दीपक नांदगावकर यांनी सादर केलेल्या या नाटकात तब्बल 21 कलावंत सहभागी होते. नाटकाचा केंद्रबिंदू म्हणजे एका अशा कुटुंबातील मुलाचे आयुष्य, ज्याचे वडील लेखक आणि आई बुटीक संचालक आहे. लहानपणीपासूनच मुलाचा मुलीसारखा स्वभाव दिसून येतो आणि वाढत्या वयात एका मुलावर प्रेम जडते. लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून लग्न करण्याची त्याची इच्छा असते, मात्र आईच्या तीव्र विरोधामुळे घर सोडून जाण्याचा निर्णय तो घेतो. त्यानंतर किन्नर समाजात त्याचा प्रवेश आणि त्या समाजातील संघर्षमय जीवनामुळे उभा राहणारा भावनिक ताण कथानकाला अधिक तीव्रतेने उलगडतो. शेवटी अत्याचाराला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या करणारा नायक प्रेक्षकांना अंतर्मुख करून जातो. सामाजिक वास्तव आणि संवेदनांवर भाष्य करणारी ही नाट्यकृती प्रेक्षकांची मनं जिंकून गेली. शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी हिंद मल्टिपर्पज फाउंडेशनची द वल्चर अँड द लिटिल गर्ल ही नाट्यकृती सादर केली गेली. गणेश वानखेडे लिखित व तुषार स्वर्गीवकर दिग्दर्शित या नाटकाची कथा 1993 मध्ये फोटोग्राफर केविन कार्टर यांनी टिपलेल्या जागतिक पातळीवर चर्चित झालेल्या एका फोटोग्राफवर आधारित आहे. एका अशक्त व मरणासन्न मुलीच्या पाठीमागे घात लावून बसलेल्या गिधाडाचा फोटो जगभर प्रसिद्ध झाल्यानंतर कार्टरवर उठलेल्या नैतिक प्रश्नांनी त्याला मानसिक त्रास झाला आणि अखेर त्याने आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर नाट्यकृती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर, म्हणजे माध्यमांवर, प्रभावी भाष्य करते. नाटकातील कथानायक मानसिक रुग्ण असून विविध काल्पनिक पत्रांशी संवाद साधत प्रेक्षकांना वास्तवाचा आरसा दाखवतो. फक्त दोन कलाकार – संजय काळे आणि तुषार स्वर्गीवकर – यांनी उभा केलेला हा प्रभावी नाट्यानुभव रसिकांच्या मनावर ठसा उमटवून गेला. नेपथ्य (अरविंद वानखेडे), पार्श्वसंगीत (गणेश वानखेडे), प्रकाशयोजना (सौरभ शेंडे), रंगभूषा (जुनेद खान) आणि वेशभूषा (डॉ. आशिष इखार) या सर्व विभागांचे समन्वित कामही लक्षणीय ठरले. या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना सुसज्ज नाट्यगृहात आरामदायी वातावरणात दर्जेदार नाटकांचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ड. आशिष शेलार आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीपणे पार पडत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी दिली. स्पर्धेअंतर्गत दि. 22 नोव्हेंबर रोजी पंचशील बहुउद्देशीय संस्था निर्मित उत्तरायण हे नाटक सादर होणार असून, नाटकप्रेमींनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून हौशी रंगकर्मींचे मनोबल वाढवावे, असे आवाहन संचालक चवरे यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी तिकीटदर केवळ 10 आणि 15 रुपये इतके अल्प ठेवण्यात आले असून, सर्वसामान्य रसिकांना उत्कृष्ट नाट्यकृती पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याची माहिती स्पर्धा समन्वयक विशाल फाटे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button