नामांकन छाननी-माघारीनंतर निवडणुकीत उलथापालथ

उमेदवार कमी; लढतींचे समीकरण बदलले

अमरावती /20 नोव्हेंबर : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामांकन छाननीनंतर अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठीची एकूण स्पर्धा मोठ्या प्रमाणात बदलली आहे. छाननी प्रक्रियेत वैध ठरलेल्या अर्जांची संख्या निश्चित झाल्यानंतर 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या अर्ज माघारीमुळे अनेक नगरपरिषदांतील लढतींचे समीकरण पूर्णपणे बदलले.
काही प्रभागांत उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या घटली तर काही ठिकाणी बहुकोनी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अचलपूरमधील एका उमेदवाराचे नामनिर्देशन न्यायालयीन प्रकरणामुळे रद्द झाल्याने तेथील निवडणूक आणखी नाट्यमय झाली आहे. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या छाननीनंतर वैध अर्जांची स्थिती पुढीलप्रमाणे निश्चित झाली : चांदूर बाजार येथे अध्यक्ष पदासाठी 7 आणि सदस्य पदासाठी 111 अर्ज वैध ठरले. दर्यापूर येथे अध्यक्ष 7 आणि सदस्य 127, चांदूर रेल्वे येथे अध्यक्ष 6 आणि सदस्य 99 अर्जांना मान्यता मिळाली. नांदगाव खंडेश्वर येथे अध्यक्ष 11 आणि सदस्य 78, धरणी येथे अध्यक्ष 13 आणि सदस्य 88, धामणगाव रेल्वे येथे अध्यक्ष 3 आणि सदस्य 52 अर्ज वैध राहिले. वरुडमध्ये अध्यक्ष 11 आणि सदस्य 122, अंजनगाव सुर्जी येथे अध्यक्ष 12 आणि सदस्य 232, तर अचलपूरमध्ये अध्यक्ष 16 आणि सदस्य 314 अर्जांना मान्यता मिळाली. शेंदूरजनाघाटमध्ये अध्यक्ष 6 व सदस्य 87 आणि मोर्शी येथे अध्यक्ष 11 व सदस्य 153 अर्ज वैध ठरले. चिखलदरा येथे अध्यक्ष 5 आणि सदस्य 53 अर्जांना छाननीत उत्तीर्णता मिळाली. छाननीनंतरच्या माघारीच्या प्रक्रियेत 19 नोव्हेंबर रोजी अचलपूर नगरपरिषदेत अध्यक्ष पदाचे 2 उमेदवार शर्यतीतून बाहेर पडले. सदस्य पदासाठी दर्यापूरमधील 1, अचलपूरमधील 1 आणि मोर्शीमधील 3 उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. 20 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीचा वेग आणखी वाढला. नांदगाव खंडेश्वर येथे अध्यक्ष पदाचे 2, अंजनगाव सुर्जीमध्ये अध्यक्ष पदाचा 1, अचलपूरमध्ये 2 आणि मोर्शीमध्ये अध्यक्ष पदाचे 6 उमेदवारांनी स्पर्धेतून माघार घेतली. सदस्य पदासाठी चांदूर बाजार येथे 1, दर्यापूरमध्ये 2, धामणगाव रेल्वेमध्ये 2, वरुडमध्ये 2, अंजनगाव सुर्जीमध्ये 4, अचलपूरमध्ये 6, मोर्शीमध्ये 6 आणि चिखलदरामध्ये 4 उमेदवारांनी आपली नामांकनपत्रे मागे घेतली. अचलपूर नगरपरिषदेत एका उमेदवारावरील न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्याने त्याचे नामनिर्देशनही रद्द करण्यात आले. त्यामुळे अचलपूरमधील अध्यक्ष आणि सदस्य पदांच्या लढतींचे स्वरूप आणखी बदलले असून काही प्रभागांमध्ये लढत अधिक सरळ झाली आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अधिकृत अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. छाननी आणि माघारीनंतर अनेक ठिकाणी थेट द्विपक्षीय लढती निर्माण झाल्या असल्या, तरी काही नगरपरिषदांमध्ये बहुकोनी स्पर्धा कायम असल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवसांत प्रचार मोहीम गती धरू लागणार असून निवडणुकीच्या वातावरणात चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button