नामांकन छाननीत अनेकांना धक्का; नगराध्यक्षांचे 19 अर्ज रद्द

सदस्य पदांचे 295 अर्जही बाद; अचलपूर नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक 16 उमेदवार

अमरावती /19 नोव्हेंबर : सोमवारी छाननी प्रक्रियेदरम्यान नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या अनेक अर्जांमध्ये त्रुटी निदर्शनास आल्याने तब्बल 19 नामांकन अर्ज अवैध ठरविण्यात आले. तसेच सदस्य पदांसाठी दाखल झालेल्या 295 अर्जांनाही नियमबाह्य ठरवत बाद करण्यात आले.
अमरावती जिल्यातील विविध नगरपरिषदांमध्ये या छाननीचा मोठा परिणाम उमेदवारांच्या संख्येवर दिसून आला. काही ठिकाणी मोठ्या संख्येने अर्ज बाद झाल्याने निवडणूक लढविणार्‍यांची वास्तविक संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. अनेक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची कमतरता, न भरलेली शुल्क पावती, आरक्षणानुसार कागदपत्र सादर न करणे, निवास प्रमाणपत्रातील विसंगती आदी कारणांवरून अपात्र ठरविण्यात आले. जिल्ह्यातील 22 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. यापैकी अनेकांचा छाननी प्रक्रियेत नकार झाला. विशेषतः काही नगरपरिषदांमध्ये पक्षांतर्गत गटबाजीमुळे एकाच पदासाठी अनेक उमेदवारांच्या नावांचा विचार करण्यात आला होता. परंतु नियमांच्या कसोटीवर तपासले असता काही उमेदवारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. अचलपूर नगरपरिषदेत सर्वाधिक 16 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत कायम राहिले आहेत. या ठिकाणी एकूण 21 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी काही अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने नामांकन मागे घेण्याचे किंवा बाद होण्याचे प्रमाण वाढले. छाननीनंतर अधिकृतरीत्या 16 उमेदवारांची नावे शर्यतीत निश्चित झाली. त्यामुळे अचलपूरमध्ये बहुकोनी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांमध्येही अशाच स्वरूपाचे निकाल लागले. काही ठिकाणी 10 ते 12 अर्ज बाद झाले, तर काही नगरपरिषदांत फारच कमी अर्ज अवैध ठरले. सदस्य पदांसाठी मात्र एकूण 295 अर्ज बाद झाल्याने अनेक प्रभागांतील लढतींचे गणित बदलले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button