चाकूने वार करून युवकाची निर्घृण हत्या…
विलास नगरातील संविधान चौकात थरारक घटना

* बुलेटवरून आलेल्या तिघांचा प्राणघातक हल्ला
* गाडगे नगर व गुन्हे शाखा पोलीस पथक आरोपीच्या शोधात
* घटना सीसीटीव्हीत कैद… संशयात 3 आरोपी ताब्यात
अमरावती /19 नोव्हेंबर : शहराच्या गर्दीच्या मध्यवर्ती भागात बुध वारी सायं काळी सहाच्या सुमारास विलास नगरातील संविधान चौकात तिघांनी बुलेटवरून येत 19 वर्षीय यश रवींद्र पाटणकरची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. काही सेकंदांत घडलेल्या या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले असून गाडगेनगर पोलिसांसह गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, यश हा घराजवळ गिट्टी उचलण्याचे काम करत असताना काळ्या बुलेटवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्याच्यावर अचानक झडप घातली. अचानकपणे चाकू काढून त्यांनी काही क्षणांतच यशवर सलग वार केले. हल्ल्याची गती इतकी वेगवान होती की उपस्थित नाग रिकांना कोण त्याही प्रकारे प्रतिकार करणे अशक्य झाले. वारामुळे गंभीर जखमी झालेला यश रक्ताच्या तलावात कोसळला आणि आरोपी मोटरसायकल सुरू करून मोठ्या वेगात गावाच्या दिशेने फरार झाले.हल्ल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी आरडाओरडा करत यशला उचलून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात तत्काळ उपचार न मिळाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या हत्येमुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला. कुटुंबीयांचा आक्रोश वाढला असून यशच्या मृत्यूने परिसरातील वातावरण अधिकच भारले. घटनेनंतर डीसीपी गणेश शिंदे, गाडगेनगर पोलीस तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संविधान चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तिघा आरोपींच्या संपूर्ण हालचाली टिपल्या गेल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची अंगकाठी, कपडे, त्यांची मोटरसायकल, गती व दिशांचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे परिसरातील मोबाइल लोकेशन, रस्त्यावरील इतर कॅमेरे आणि स्थानिक माहितीचा मागोवा घेत तपासाचा वेग वाढविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी धाडसत्र राबवले. संशयितांच्या घरांवर, त्यांचे शक्य तितके ठिकाणी पोलिसांनी दबाव टाकला. या कारवाईदरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. मात्र तिघांपैकी कोणत्याही संशयिताने हत्येबाबत ठोस कबुली दिलेली नाही. तथापि, काही महत्वाच्या धागेदोरे मिळाल्याचे सूत्रांकडून समजते.
मृत यशवर पूर्वी कलम 307 अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीही त्याचे काही व्यक्तींशी वाद झाले असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे हा हल्ला प्रतिशोधातूनच घडवून आणला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यश काही काळ खाजगी रुग्णालयात काम करीत होता. नोकरी सोडल्यानंतर तो घराजवळील कामे करत असे. नुकताच त्याचा वाढदिवस झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते; परंतु त्याच्यावर झालेल्या या अकस्मात हल्ल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनास्थळ, पुरावे, साक्षीदारांची माहिती आणि तांत्रिक साधनांचा आधार घेत तपास सुरू आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे निर्भयपणे हत्या होणे, हे पोलिसांसाठीही मोठे आव्हान ठरले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास जलद गतीने सुरू आहे. तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सर्व तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. आरोपींची ओळख पटवून अटक करण्यासाठी पथके कामाला लागली आहेत.
-संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा




