हवाला रॅकेटचा जम्मू-कश्मीरपर्यंत विस्तार
अमरावतीतील तिघांचा सहभाग उघड

अमरावती /19 नोव्हेंबर – चीन आणि कंबोडिया येथून नियंत्रित होणार्या मोठ्या आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेटचे जाळे महाराष्ट्रासह देशभरात पसरले असून, या रॅकेटचा शोध घेताना नागपूर पोलिसांना आता जम्मू-कश्मीरपर्यंत पुरावे मिळू लागले आहेत. नागपूर गुन्हा शाखेने 12 नोव्हेंबरला 23 जणांना अटक करून या रचनेचा भांडाफोड केला होता.
या रॅकेटने किरायाने उघडलेल्या खात्यांचा वापर करून तब्बल 40.87 कोटी रुपये हवाला, ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगच्या माध्यमातून चीन व कंबोडियाला पाठविल्याचे समोर आले होते. ताज्या तपासात या गटातील आणखी एक सदस्य जम्मू-कश्मीर येथून अटक करण्यात आला असून, या जाळ्याचे धागेदोरे आता ‘घाटी’पर्यंत जोडले जात असल्याची खात्री मिळाली आहे.
नागपूर पोलिसांच्या कारवाईत पकडलेल्या 23 आरोपींपैकी अमरावती शहरातील राहुल संजय जुनी (जवाहर गेट), देवेश महेश वजीर (सराफा बाजार, जवाहर गेट) आणि अमर संजय वाघोलकर (नीलकंठ चौक) या तीन युवकांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. तिघांचीही ओळख नागपूर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाली असून, अमरावती शहराशी जोडलेल्या या आरोपींमुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. देशभरातील 21 राज्यांत एकूण 174 तक्रारी या रॅकेटविरुद्ध नोंद झालेल्या आहेत. यापैकी 25 तक्रारी महाराष्ट्रात, तर काही नागपूरमध्येसुध्दा दाखल झाल्या आहेत. हे रॅकेट देशभरातील बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना ‘पार्टनरशिप व्यवसाय’चे आमिष दाखवून जाळ्यात ओढत असे. विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्या आधार कार्ड, पॅनकार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने नवीन बँक खाती उघडली जात. ही खाती पूर्णपणे आरोपींच्या नियंत्रणात ठेवली जात आणि खातेदाराला दरमहा 15 ते 20 हजार रुपये कमिशन दिले जात. या खात्यांचा वापर हवाला, ऑनलाइन गेमिंग ट्रान्झॅक्शन आणि इतर बेकायदेशीर आर्थिक देवाणघेवाणीसाठी केला जाई. या व्यवहारांबद्दल खातेदारांना कोणतीही माहिती देण्यात येत नसे. या गटाने व्यवहारासाठी टेलिग्राम, वॉट्सअॅपसारख्या मेसेजिंग अॅप्सचा वापर केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गटातील मुख्य सदस्य आणि तांत्रिक पथके एकमेकांशी चिनी भाषेतील कोडवर्ड्स वापरून संवाद साधत. यामुळे व्यवहारांचा मूळ माग काढणे कठीण जात होते. मात्र तांत्रिक पुरावे गोळा करत गेल्यानंतर नागपूर पोलिसांनी या रॅकेटचा पाया उखडून काढण्यात यश मिळवले. आता जम्मू-कश्मीरमधून झालेली अटक हे रॅकेट किती दूरवर पसरले होते, याचे आणखी स्पष्ट उदाहरण ठरत आहे. अमरावतीतील आरोपींच्या अटकेनंतर शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिस प्रशासनही सजग झाले आहे. पकडलेल्या युवकांनी अमरावती व जिल्ह्यात किती लोकांकडून खाती किरायाने घेतली, या खात्यांमधून किती व्यवहार झाले, याचा तपास सुरू आहे. तसेच या तिघांव्यतिरिक्त शहरात किंवा बाहेर किती जण या आंतरराष्ट्रीय रॅकेटसाठी सक्रिय होते, हेही शोधण्यात येत आहे. या प्रकरणात आता एकूण 24 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, भारतातील विविध राज्यांमध्ये पसरलेल्या या रॅकेटमुळे देशांतर्गत आर्थिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती शहरातील युवक प्रथमच अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग रचनेत सामील असल्याचे समोर आले असल्याने स्थानिक पोलिसही हा तपास अत्यंत गांभीर्याने करत आहेत.




