अमरावतीच्या ‘सिटी बर्ड’ निवड प्रक्रियेला सुरूवात
18 ते 28 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाईन मतदानाची संधी

अमरावती /18 नोव्हेंबर : अमरावती महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ अंतर्गत शहराचा अधिकृत ‘सिटी बर्ड’ निवडण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू केली असून नागरिकांना ऑनलाईन मतदानाद्वारे सहभाग नोंदवण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे. शहरातील जैवविविधता, पक्षीसंवर्धन आणि पर्यावरणाबाबत जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका आणि वाइल्डलाईफ एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन सोसायटी (थएउड) यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहराच्या परिसंस्थेचे प्रतिनिधित्व करणार्या सहा पक्ष्यांची प्राथमिक यादी अंतिम करण्यात आली आहे. या पक्ष्यांपैकी एकाची निवड ‘अमरावतीचा शहराचा पक्षी’ म्हणून होणार असून मतदानासाठी खास ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलचा दुवा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मीडिया खात्यांवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारीत राखी धनेश, तांबट, हुदहुद, ठीपकेवाला पिंगळा, शिक्रा आणि भारव्दाज या सहा पक्ष्यांचा समावेश करण्यात आला आहे. राखी धनेश हा मोठ्या झाडांमध्ये वास्तव्य करणारा आणि बीजप्रसारात महत्त्वाची भूमिका बजावणारा पक्षी असून तांबट हा खणखणीत आवाजासाठी ओळखला जाणारा छोटा पण रंगीबेरंगी पक्षी आहे. हुदहुद हा वैशिष्ट्यपूर्ण तुर्यासह ओळखता येतो, तर ठीपकेवाला पिंगळा हा शहरातील जुन्या वास्तू आणि झाडांच्या फटींमध्ये आढळणारा उपयुक्त घुबडवर्गीय पक्षी मानला जातो. शिक्रा हा वेगवान शिकारी पक्षी असून भारव्दाज हा विटकरी पंख आणि लाल डोळ्यांमुळे सहज ओळखला जातो. निवड प्रक्रियेसाठी 18 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर असा मतदानाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून येत्या 30 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. नागरिकांनी आपल्या पसंतीनुसार मत नोंदवून शहराच्या पर्यावरणपूरक प्रतिमेला हातभार लावावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.




