उशीर झाला अन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुकले…

अर्ज दाखलासाठी ‘तीन’चा गजर अधिकारी-इच्छुक उमेदवार आमनेसामने

परतवाडा /17 नोव्हेंबर – अचलपूर नगरपालिका निवडणुकीत आज (17 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज स्वीकृतीचा शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच नगरपरिषद कार्यालयात उमेदवारांची मोठी लगबग पाहायला मिळत होती. बहुतेकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत दुपारी बरोबर तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल केले. निवडणूक वेळापत्रकानुसार तीन वाजल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, याबाबत प्रशासनाने सकाळीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या.दुपारी तीन वाजता ठोक बजावताच अचलपूर नगरपरिषदेच्या पंडित छेदिलालजी मिश्र सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. आतमध्ये आधीच उपस्थित इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची अंतिम संधी देण्यात आली. मात्र त्याचवेळी प्रभाग क्र. 14 मधून उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेल्या अनिता रवी वानखडे या काही मिनिटांच्या उशिरामुळे अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहिल्या.निवडणूक कर्मचार्‍यांनी आता खूप उशीर झाला आहे; तीन वाजल्यानंतर अर्ज स्वीकारता येणार नाही, असे सांगत त्यांचा अर्ज घेण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या वानखडे यांनी, आम्ही पंधराशे रुपयांची पावतीही फाडलेली आहे, तरी प्रशासन अर्ज घेण्यास तयार नाही; आम्हाला निवडणूक लढण्यापासून दूर ठेवले जात आहे, असा आरोप केला.
उमेदवारीसाठी तीन वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती. मुदतीच्या आत अर्ज प्राप्त झाला नसल्याने त्यांना वापस जावं लागलं.
– बळवंत अरखराव,निवडणूक निर्वाचन अधिकारी, अचलपूर
मी दुपारी दोनपासून सभागृहात बसले होते. पंधराशे रुपयांची पावतीही फाडलेली होती. तीन वाजताच कर्मचार्‍यांनी आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले. मला निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवलं आहे.
– अनिता रवी वानखडे, इच्छुक उमेदवार

संबंधित बातम्या

Back to top button