शक्तिप्रदर्शनाच्या महाभारतात उमेदवारांची दमदार एन्ट्री
सात नगराध्यक्ष, 139 नगरसेवक अर्ज; तुफानी रॅलींनी शहराचे वातावरण तापले

दर्यापूर /17 नोव्हेंबर – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्जभरणीचा अंतिम दिवस सोमवारी फारच गाजला. पहाटेपासूनच शहरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळपासून रात्रीपर्यंत रॅलींची दणदणाट, बँडबाज्यांची गजर आणि मोटार ताफ्यांची लांबलचक रांग यामुळे निवडणुकीची चाहूल अक्षरशः अंगावर येत होती. प्रत्येक पक्षाने ‘शक्ती’ दाखवण्याची मोठी संधी साधत प्रचंड प्रदर्शन केल्यामुळे शहरभर उत्साह, तणाव आणि चर्चा यांना उधाण आले.
शिवसेना (शिंदे गट) कडून नगराध्यक्षपदासाठी प्रदीप मलीये यांनी मोठ्या जल्लोषात अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार, शिंदे सेनेचे केंद्रीय पदाधिकारी आणि जिल्ह्यातील जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी सहभाग नोंदवत मलीये यांना मोठा राजकीय पाठिंबा दिला. शेकडो कार्यकर्त्यांच्या जयजयकारात मलीये यांचा ताफा निवडणूक कार्यालयात दाखल झाला. ढोलताशांच्या गजरात वातावरण भारावले होते. भाजपनेही याठिकाणी आपली ताकद प्रभावीपणे दर्शवली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नलिनी भारसाकळे यांनी अर्ज दाखल करताना अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे मोठ्या रॅलीसह उपस्थित राहिले. भाजप कार्यकर्त्यांची उसळलेली गर्दी, भगवे झेंडे आणि घोषणाबाजी यामुळे निवडणूक कार्यालय परिसर काही वेळ गजबजून गेला. यावेळी शहरातील अनेक भागांतून आलेल्या मोटार, जीप आणि दुचाकी ताफ्यांमुळे दोन्ही पक्षांच्या शक्तिप्रदर्शनात तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांनी अर्ज दाखल करताना मोठी ताकद दर्शवली. खासदार बळवंत वानखेडे व जेष्ठ नेते सुधाकर भारसाकळे यांनी यावेळी उपस्थिती दाखवत काँग्रेसची एकजूट दाखवून दिली. गर्दीने खचाखच भरलेल्या रॅलीमुळे काँग्रेसचे शक्तिप्रदर्शनही तितकेच प्रभावी ठरले. यादरम्यान काँग्रेस, भाजप आणि शिंदे गट – या तीनही प्रमुख पक्षांच्या अफाट तयारीमुळे शहरात दिवसभर ‘कोणाची ताकद किती?’ यावर चर्चा रंगल्या होत्या. तसेच निवडणुकीच्या पार्शभूमीवर इतर पक्षांनीही परंपरेप्रमाणे दमदार हजेरी लावली, फक्त प्रमुख पक्षच नव्हे, तर इतर महत्त्वाच्या पक्षांतूनही नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – बबलू कुरेशी, एमआयएम – अदनान मारचिया, शिवसेना उबाठा – डॉ. भावना भुतडा गावंडे, दे दणका पार्टी – रमेश वर्धे या सर्व उमेदवारांनीही आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल करत आपापली ताकद दाखवली. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ दोन-तीन पक्षांपुरती न राहता व्यापक आणि बहुढंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक कार्यालयाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नगरसेवक पदांसाठी तब्बल 139 अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे अनेक प्रभागांमध्ये चुरस वाढणार असून तीन-चार उमेदवारांच्या लढती सामान्य होणार आहेत. यामुळे शहरातील सर्वच भागांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये प्रचाराची धामधूम, कार्यकर्त्यांची धावपळ आणि बैठकांना उधाण येणार आहे. यंदाच्या निवडणुकीची सर्वात मोठी चर्चा म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील पारंपरिक घराणेशाही राजकारणाला शिंदे गटाकडून मिळणारे थेट आव्हान. दोन्ही बाजूंनी दाखवलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे हा सामना अधिक रंगतदार होणार असून मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीत स्थानिक समीकरणे, जुनी नाराजी, जातीय समतोल, तरुणांचा कल, तसेच महिला मतदारांचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे. अर्ज भरणीची धामधूम संपताच शहरात आता प्रचार मोहीम वेग घेणार आहे. दर्यापूरच्या प्रत्येक गल्ली-बोळात बैठकांचे आयोजन, प्रचार रॅली, घरोघर संपर्क, मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन युक्त्या आणि घोषणांचा वर्षाव होताना दिसणार आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांमधील थेट संघर्ष, पक्षांतील अंतर्गत गटबाजी, स्वतंत्र उमेदवारांची भूमिका आणि प्रमुख नेत्यांच्या भेटीमुळे दर्यापूरची राजकीय हवा आणखी तापेल, यात शंका नाही. अखेरीस, अंतिम दिवशी झालेल्या प्रचंड राजकीय धामधुमीमुळे दर्यापूर नगरपरिषद निवडणूक 2025 ही जिल्ह्यातील सर्वात चर्चेची आणि चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.




