शक्य असेल तिथे मित्रपक्षांशी युती

स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष असेल

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

* संभाजीनगर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

* विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर/16 नोव्हेंबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. कारण या गोष्टी स्थानिक स्तरावर होत असतात. स्थानिक स्तरावर चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी महायुती झालेली आहे. काही ठिकाणी झाली नाही. स्थानिक स्तरावर हे सगळे निर्णय होत आहेत. त्यामुळे परवापर्यंत चित्र स्पष्ट दिसेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.जागावाटपाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जागावाटप वरून होतच नाही. जागावाटप हे जिल्ह्यात होते. त्यामुळे जिल्हा स्तरावर त्या-त्या पक्षांनी एकत्र येऊन त्याबाबत ठरवलेले आहे. जिथे शक्य आहे, तिथे महायुती झालेली आहे. कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे. कुठे-कुठेच युती झालेली नाही. ही जिल्हा स्तरावरची निवडणूक आहे. ही राज्याची निवडणूक नाही. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
विरोधकांनी मतचोरीसारखी धादांत खोटी मांडणी करूनही बिहारच्या निवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांना घवघवीत यश मिळाले. विरोधकांचा सुफडासाफ झाला, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळवत भाजपा क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असा दावा केला. जिथे शक्य असेल तिथे मित्रपक्षांशी युती होईल, परंतु जिथे एकत्र येणे शक्य नाही तिथेही त्यांच्याशी शत्रूसारखे न लढता विरोधात असलेला मित्रपक्ष आहे, याची जाणीव ठेवावी, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने उभारलेल्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना हा दौरा महत्त्वाचा ठरला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, बिहारमध्ये जनतेने पुन्हा मोदींवर विश्वास ठेवत विरोधकांच्या प्रयत्नांवर पाणी सोडले. हा विजय भारतीय जनता पक्षाच्या सतत वाढत असलेल्या शक्तीचा पुरावा आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला जनता आता बळी पडत नाही, असं ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राज्यातील येणार्‍या निवडणुकांतही विरोधकांना अशीच स्थिती अनुभवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपच्या संघटनात्मक बळकटीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून पक्षाने संघटनेची मुळे घट्ट रोवण्यासाठी काम केले. पुढे 2014 नंतर देशभरात प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणून संभाजीनगरातील हे कार्यालय कार्यान्वित होत आहे. फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती दिली गेली असून पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 800 कोटींचा भार उचलला गेलाय. आम्ही मंजूर केलेल्या योजनेला मागच्या सत्तेने अडथळे आणले. पण आमच्या सरकारने ती योजना मार्गी लावून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. औद्योगिक गुंतवणुकीवर बोलताना फडणवीसांनी सांगितले की छत्रपती संभाजीनगर देशातील इलेक्ट्रिक वाहन राजधानी म्हणून पुढे येत आहे. नवीन उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.समृद्धी महामार्ग, सिंचन प्रकल्प आणि नदीजोड योजना या निर्णयांमुळे मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलत असल्याचं ते म्हणाले

मतचोरी मुद्याला बिहार प्रमाणे उत्तर द्या 

विरोधकांनी मतचोरी होत असल्यासारखे निरर्थक मुद्दे रेटून अपप्रचार केला. परंतु, बिहारच्या निवडणुकीतून विरोधकांच्या अपप्रचाराला मतदारांनीच चपराक दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांची माती होईल, हे आपले भाकित खरे ठरल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे बिहारच्या यशाच्या हेच प्रारूप घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेत जावे, असा संदेश दिला. मित्रपक्षांसोबत एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी त्यांच्याशी कट्टर विरोधकांसारखे न लढता मित्रपक्ष असल्याचे भान ठेवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button