भाजपा खा.डॉ.अनिल बोंडे यांना हैदराबादहून ईमेलद्वारे धमकी

शहरात खळबळ; राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

अमरावती /16 नोव्हेंबर – शहराच्या कायदा-सुव्यवस्थेला हादरा देणारी आणि लोकप्रतिनिधीला थेट लक्ष्य करणारी धक्कादायक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. पंचवटी चौकातील वादग्रस्त बॅनर प्रकरणात कारवाईची मागणी केल्यानंतर अमरावतीचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना हैदराबाद येथून अनोळखी व्यक्तीने ईमेलद्वारे धमकी दिली. या गंभीर प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ईमेलमध्ये खासदारांना लक्ष्य करून अतिशय आक्षेपार्ह व भय निर्माण करणारे संदेश पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खासदार बोंडे यांनी तातडीने राजापेठ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही विषयाची गंभीर दखल घेऊन त्वरित गुन्हा नोंदविला आहे.
सायबर तज्ञांच्या मदतीने ईमेल पाठविणार्‍याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असून, ईमेल हैदराबादहून पाठविण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कोणतीही व्यक्ती धमकी देऊन लोकप्रतिनिधींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे राजापेठ पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, वादग्रस्त बॅनर प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पुढील तपास राजापेठ पोलीस स्टेशनद्वारे सुरू आहे. पंचवटी चौकात आय आय सी या इस्लामी संघटनेने एक वादग्रस्त बॅनर लावला होता. या बॅनरमुळे शहरात जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. सामाजिक वातावण बिघडू नये म्हणून खासदार डॉ. बोंडे यांनी तत्काळ पोलिस आयुक्तांकडे धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली. त्यांच्या तक्रारीनंतर त्या बॅनरकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले. 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.13 वाजता हैदराबादमधील एका अनोळखी आयडीवरून खासदारांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. मेलमध्ये वापरण्यात आलेली भाषा, धमकीचा पद्धतीने केलेला उल्लेख आणि खासदारांनी केलेल्या तक्रारीनंतरच तो मेल पाठवला गेल्याने संशय अधिकच गहिरा झाला आहे. लोकप्रतिनिधीला धमकी देण्यासारख्या गंभीर कृत्याने पोलिस यंत्रणेला सतर्क केले आहे. धमकीची माहिती समजताच खासदारांचे स्विय सहाय्यक रविकिरण शरदराव वाघमारे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक तपासात ईमेलचा स्त्रोत तपासला असून अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 351(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धमकी देण्याच्या गुन्ह्यांतर्गत ही कारवाई गंभीर मानली जाते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर सेलची मदत घेण्यात आली आहे. ईमेल कोणत्या डिव्हाइसवरून पाठवला गेला, कोणत्या नेटवर्कचा वापर करण्यात आला, मेल आयडी फर्जी आहे का, संपूर्ण शृंखला काय आहे याचा तपास वेगाने सुरू आहे. पोलिस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाठवणार्‍यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. वादग्रस्त बॅनर शहरात कोणत्या उद्देशाने लावण्यात आला आणि त्यानंतर खासदारांना धमकी कशासाठी देण्यात आली? या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का? त्यामागे कोणते गट, व्यक्ती किंवा संगनमत कार्यरत आहे का? पोलिस सर्व शक्यता तपासत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. घटनेनंतर काही भागात नागरिकांमध्ये चर्चा व संभ्रमाचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही अफवा किंवा भडकावू संदेशांना बळी न पडण्याचे सांगितले आहे. अद्याप आरोपीचा शोध सुरू असून तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी सतर्कता वाढविली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button