चांदुर बाजार येथे 8.62 लाखांची घरफोडी

रोख व दागीणे लंपास

चांदुर बाजार/ 3 जून : घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दाराचे कुलुप तोडले आणि आत प्रवेश करुन 4.20 लाखांची रोकड व सोन्या चांदीचे दागीणे असा एकुण 8 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना चांदुर बाजार येथील धर्माळेपुरा परिसरात सोमवारी उघडकीस आली. याबाबत मो. सादिक शे. रहेमतुल्ला (43) यांनी चांदुर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार मो. सादिक हे कुटुंबियांसह नातेवाईकाकडे असलेल्या विवाह सोहळ्यासाठी कारंजा लाड येथे 28 मे रोजी गेले होते. दरम्यान सोमवारी सकाळी त्यांच्या शेजारी राहणार्‍या त्यांच्या साडभावाने त्यांना फोन केला आणि तुमच्या घराचे कुलुप तुटलेले दिसते, चोरी झाल्याची शक्यता आहे, असे मो. सादिक यांना सांगितले. त्यामुळे मो. सादिक हे तात्काळ चांदुर बाजार येथे आपल्या घरी परतले. तेव्हा त्यांना घराच्या दाराचे कलुप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केला असता घरातील संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसून आले. आलमारी उघडी होती.
शहानिशा केली असता आलमारीतील 4 लाख 20 हजार रुपयांची स्टिलच्या डब्यातील रोकड आणि सोन्याचे विविध प्रकारचे दागीणे असा एकुण 8 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याने निदर्शनास आले. मो. सादिक यांनी तात्काळ चांदुर बाजार पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या

Back to top button