600 अपंगांसाठी करणार ‘जयपूर फूट’ वितरण

पीडीएमएमसीचा उपक्रम

अमरावती / 14 नोव्हेंबर – श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे संचालित पीडीएमएमसी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, आर्किटेक्ट रामेश्वर मणियार आणि अंबादास खोब्रागडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त ‘जयपूर फूट’ वितरण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आज दुपारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जयपूर फूट कॅम्प 18 ते 27 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 600 अपंग व्यक्तींना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. अपंग बांधवांसाठी हा उपक्रम नवी आशा आणि चालना देणारा ठरेल, असा आयोजकांचा दावा आहे. पत्रकार परिषदेत शिवाजी शिक्षण संस्थेचे खजिनदार दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, डीन डॉ. ए. टी. देशमुख, प्राचार्य डॉ. किशोर मालोकर, रामेश्वर मणियार, संदीप पुंडकर, रजनी अंबाडे, आकाश अंबाडे, प्रभज्योतसिंग बच्छेर आदी उपस्थित होते. या उपक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयातील विशेष अधिकारी योगेश कोतेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि महानगरपालिकेचे डॉ. विशाल काळे यांचे सक्रीय सहकार्य लाभत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रजनी अंबाडे यांच्या कलाकृतींचे थीम प्रदर्शनही आयोजकांनी नियोजित केले आहे. रेड क्रॉसचे अध्यक्ष डॉ. किशोर मालोकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक नगरसेवक या सामाजिक उपक्रमात सक्रियपणे सहभागी होत आहेत. अपंगांसाठी हे आयोजन आशेचा किरण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button