आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेटमध्ये अमरावतीचे तीन युवक अटकेत
परदेशात पाठवले करोडो रुपये; हवाला, बेटिंग व ऑनलाइन गेमिंगचा वापर

अमरावती/13 नोव्हेंबर – नागपूर पोलिसांनी उघड केलेल्या मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अमरावती शहरातील तीन युवकांचा सहभाग उघडकीस आला आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरायाने घेतलेल्या बँक खात्यांचा वापर करून हवाला, बेटिंग आणि ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तब्बल 40 कोटी 87 लाख रुपये चीन व कंबोडिया या देशांमध्ये पाठवण्यात आले. या प्रकरणात अमरावतीचे राहुल जुनी, देवेश वजीर आणि अमोल वाघोलकर या तिघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या देशव्यापी रॅकेटशी अमरावतीचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, आणखी किती लोक या गटाशी संबंधित आहेत, याची तपासणी सुरू आहे. या रॅकेटमधील आरोपी बेरोजगार किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना भागीदारीत व्यवसायाचे आमिष दाखवत. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अन्य कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाते उघडले जात असे. त्या खात्यांवर आरोपींकडेच नियंत्रण ठेवले जात असे. खातेदाराला फक्त 15 ते 20 हजार रुपये कमिशन दिले जात असे आणि त्या खात्यांचा वापर बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला जात असे. हे व्यवहार टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होत असत. पोलिस किंवा इतर यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून या गटाचे सदस्य चिनी भाषेतील कोडवर्ड्सचा वापर करत असत. या प्रकरणानंतर अमरावती शहर आणि ग्रामीण पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अटक केलेल्या युवकांनी शहरात व जिल्ह्यात आणखी किती लोकांची खाती वापरली आहेत आणि या रॅकेटसाठी आणखी कोण कार्यरत होते, हे शोधले जात आहे. मनी लाँडरिंगशी संबंधित कोणत्याही आंतरराष्ट्रीय गुन्ह्यात अमरावतीतील युवकांचा सहभाग प्रथमच समोर आला असल्याने पोलिस या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पाहत आहेत.
अटक झालेले आरोपी – अमरावतीचे राहुल जुनी, देवेश वजीर, अमोल वाघोलकर, तसेच नागपूरचे वैभव बघेल, रोहित कांबळे, सोहेल अब्दुल, सलीम खान, पंकज शेखर टेटे, श्रेयस मस्के, अभिषेक गुप्ता, सुजीतसिंह बेदी, सागर बागडे, गोंदियाचे सुमित पटले, पुण्याचे अजहर शेख, अक्षय काजले, नाशिकचे विजय नरोटे, चंद्रकांत शिरोळे, मध्यप्रदेशातील अश्विन भार्गव, अनिल कुमार, सुशांत राऊत, दीपक विश्वकर्मा, पंकज विश्वकर्मा, आशीष बसेडिया व ओडिशाचे शेख मैदुल शफिउल रहमान या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.




