‘इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर’च्या होर्डिंगवरून भाजप आक्रमक

लव्ह जिहादचा प्रसार रोखा; समाजात तणाव निर्माण करणार्‍यांना थारा देणार नाही!-डॉ.खा.अनिल बोंडे

शहर पोलिस आयुक्तांकडे निवेदन; होर्डिंग हटवण्याची मागणी

अमरावती /13 नोव्हेंबर – शहरातील काही प्रमुख चौकांवर लावण्यात आलेल्या इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या होर्डिंगमुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या होर्डिंगच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’चा प्रसार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भाजपकडून पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रतिनिधीमंडळ गुरुवारी पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झाले. शहरातील विविध ठिकाणी झळकणार्‍या धर्मप्रचाराच्या या बोर्डांबाबत भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉ. बोंडे यांनी पोलिस प्रशासनाला प्रश्न केला की, शहराच्या प्रमुख चौकांवर अशा प्रकारचे धार्मिक प्रचाराचे फलक लावण्याची परवानगी कोणी दिली? भाजपकडून पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या बोर्डांच्या माध्यमातून समाजात तणाव निर्माण करण्याचा आणि युवकांना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासनाने यामागील साखळी उघड करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
डॉ. बोंडे यांनी सांगितले की, या प्रकारामागे काही राष्ट्रविरोधी प्रवृत्ती सक्रिय आहेत. शहरातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा कट सुरू आहे. पोलिसांनी त्वरित पावले उचलली नाहीत, तर भाजपकडून मोठं आंदोलन उभं केलं जाईल.
या वेळी शहराध्यक्ष नितीन धांडे, महामंत्री राधा कुरील, किरण महल्ले, प्रणीत सोनी, उमेश निलगिरे, मिलिंद बांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस आयुक्तांशी सुमारे अर्धा तास चर्चा करून भाजप नेत्यांनी प्रशासनाला ठोस कारवाईचा इशारा दिला. पोलिस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, परवानगीशिवाय फलक लावण्यात आलेत का, याचा तपास सुरू आहे. या वेळी उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, क्राइम ब्रांच निरीक्षक संदीप चव्हाण आणि सहायक निरीक्षक महेंद्र इंगळे उपस्थित होते.
शहरातील वातावरण तापले- या घटनेनंतर अमरावतीत राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. भाजपने प्रशासनाला इशारा दिला आहे की, धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. शहरातील शांतता राखण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button